त्र्यंबकला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:31 PM2020-01-02T23:31:09+5:302020-01-02T23:31:29+5:30
तीन दिवसांपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तुंगारेश्वर, ता. वसई, जि. पालघर येथील बालयोगी सदानंद महाराज श्री ज्ञानेश्वरी पारायण समितीतर्फे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ज्ञानेश्वरी पारायणासाठी हजारो भाविक पारायणासाठी बसले आहेत. यावेळी ब्रह्मवृंदांचा सत्कार करण्यात आला.
त्र्यंबकेश्वर : गेल्या तीन दिवसांपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तुंगारेश्वर, ता. वसई, जि. पालघर येथील बालयोगी सदानंद महाराज श्री ज्ञानेश्वरी पारायण समितीतर्फे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ज्ञानेश्वरी पारायणासाठी हजारो भाविक पारायणासाठी बसले आहेत. यावेळी ब्रह्मवृंदांचा सत्कार करण्यात आला.
पारायणाचे नेतृत्व स्वत: बालयोगी सदानंद महाराज करीत असून, व्यासपीठावर कबीर महाराज म्हात्रे, पुरु षोत्तम महाराज म्हात्रे, महादेव बुवा शहाबाजकर, देसाई महाराज उपस्थित होते. पारायणानंतर विश्वनाथ महाराज वारिंगे हे ज्ञानेश्वरी पारायणवर चिंतन सांगत आहेत. सोहळ्यामध्ये आलेल्या भक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना नि:शुल्क आयुर्वेदिक औषधांचे वाटप करण्यात येत आहे.
सुप्रसिद्ध गायक नारायणदास बुवा पाटील, वैभव कडू यांची भजने झाली. त्यानंतर त्र्यंबकेश्वर, नाशिकमधील वेदशास्र संपन्न ब्रह्मवृंदांचा सत्कार करण्यात आला. सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीने परमपूज्य बालयोगी श्री सदानंद महाराजांचा सन्मान करून त्यांना एक सन्मान पत्रही देण्यात आले. महाराष्ट्रातील थोर अभ्यासू कीर्तनकार महादेव महाराज राऊत यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सदर कार्यक्रमाच्या रूपरेषेची माहिती व कार्यक्रम मार्गदर्शक विश्वनाथ महाराज वारिंगे व व्यवस्थापक संजय भंडारे यांनी दिली. सातही दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, बालयोगी श्री सदानंद महाराज यांनी आपले जीवनकार्य ज्ञानेश्वरी प्रचार प्रसाराकरिता वाहून घेतले असून, ज्ञानेश्वरीचा प्रसार पारायणाद्वारे महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड, ओरिसा, तामिळनाडू याबरोबरच पाश्चात्त्य देशांमध्ये कॅनडा, थायलंड, मॉरिशस, श्रीलंका आदी देशांमध्ये केला आहे. या देशांचे, महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांत पारायणापेक्षा वाचनाला महत्त्व दिले जाते. ज्ञानेश्वरीचा वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. श्रीगुरु जोग महाराज पुण्यतिथी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्यस्तरीय भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिनाम महोत्सवाचे आयोजन श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आले आहे.
ब्रह्मवृंदांचा सत्कार
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील शांतारामशास्त्री भानोसे, धनंजयशास्त्री जोशी, दिनेशशास्त्री गायधनी, मधुकर अकोलकर, केदारशास्त्री पाटणकर, तीर्थराजशास्त्री घैसास, बाळासाहेब दीक्षित, रमेश सुलाखे, गणेश पुरी, योगेश शुक्ल, रमेश पाटणकर, अनंत ढेरगे, चेतन ढेरगे, त्रिविक्र म जोशी, सुनील सुलाखे, जगदीश जोशी, बाळासाहेब सुलाखे आदी सर्व वेदशास्त्रसंपन्न ब्रह्मवृंदांचा सत्कार शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ हार व ज्ञानेश्वरीची प्रत देऊन करण्यात आला.