जे काम कराल, ते सर्वोत्तम करा
By admin | Published: February 19, 2017 01:17 AM2017-02-19T01:17:00+5:302017-02-19T01:17:16+5:30
हनुमंतराव गायकवाड : ‘संवाद’ उद्घाटनाप्रसंगी नवउद्योजकांना कानमंत्र
नाशिक : निष्ठने आणि प्रामाणिकपणे चांगले काम करणाऱ्यांना त्यांच्या कामात निश्चित यश मिळते, त्यामुळे जे काम कराल ते सर्वोत्तम करा, असे आवाहन करतानाच कामात सर्वोत्तम व्हा, जग तुमच्या पाठीशी राहील, असा कानमंत्र भारतीय उद्योग क्षेत्राच्या नकाशावर छाप उमटविणारे बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांनी नवउद्योजकांना दिला.
ई अॅण्ड जी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे ठक्कर डोम येथे ‘संवाद-२०१७’ चे उद्घाटनप्रसंगी गायकवाड बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, मुंबई डबेवाला संघटनेचे सुभाष तळेकर, आॅनलाइन पत्रकारिता क्षेत्रातील केरोलिना गोस्वामी, संजीव कोराडा, संदीप डागा आदि उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचा आपल्या जीवनावर प्रभाव आहे. स्वामी विवेकानंद यांनी १०० नचिकेता वृत्तीचे तरुण हे जग बदलू शकतात, असे म्हटले होते. त्यांच्या या १०० तरुणांपैकी मी स्वत: एक असल्याचे समजतो. त्यामुळे सायकलवर ४५ किमीचा प्रवास करून शिक्षण घेणारा माझ्यासारखा सामान्य घरातील मुलगा हा विचार समोर ठेवूनच यश मिळवू शकतो. असे यश निष्ठने काम कराणाऱ्या प्रत्येकजण मिळवू
शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी भारत विकास ग्रुप प्रयत्न क रीत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अविनाश सिसोदे यानी केले. (प्रतिनिधी)