खाण्याचा सोडा वापरून घरच्या घरी करा गणेश विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:20 AM2021-09-09T04:20:03+5:302021-09-09T04:20:03+5:30
गणेशोत्सव आनंदाचा सण असला तरी हा उत्सव पर्यावरणप्रेमी असला पाहिजे, यावर आता भर दिला जात आहे. नाशिकमध्ये गेल्या अनेक ...
गणेशोत्सव आनंदाचा सण असला तरी हा उत्सव पर्यावरणप्रेमी असला पाहिजे, यावर आता भर दिला जात आहे. नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विसर्जित मूर्ती दान घेतले जात असलेे तरी आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे घरीच विर्सजन देखील केले जात आहे. शाडू मातीच्या मूर्तीं घरीच बादलीत विसर्जित करून ती माती बागेत वापरता येते. मात्र, आता त्या पलीकडे जाऊन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती देखील काही वर्षांपासून घरीच विसर्जित करता येतात. त्यासाठी अमोनिअयम बाय कार्बोनेट महापालिका उपलब्ध करून देते. मात्र, आता खाण्याचा सोडादेखील वापराला जातो.
अर्थात, अशा प्रकारच्या सोड्याचा आणि पर्यायी रासायनांचा वापर करण्यापेक्षा शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचा पर्यावरणप्रेमी आणि मूर्तिकारांकडून दिला जात आहे.
इन्फो...
पीओपीच्या मूर्तींचा वापर कमी
नाशिक शहरात गेल्या काही वर्षांत पीओपीच्या मूर्तींचा वापर कमी होत आहे. राज्य शासनाकडून यामूर्तींवर निर्बंध घातल्यानंतर देखील बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती येतात. मात्र, त्याला भाविकांचा प्रतिसाद मिळत नाही. आता घरगुती गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्तींचाच वापर केला जातो. पीओपीच्या मूर्तींचे फिनीशिंग चांगले असते. त्या अधिक सुबक दिसत असल्याने या मूर्ती प्रामुख्याने खरेदी केल्या जातात.
इन्फो...
नंतर खत म्हणून करा पाण्याचा वापर
१ खाण्याच्या सोड्यात मूर्ती ठेवल्यानंतर ती ४८ तासांत विरघळू लागतात. काही वेळा मूर्ती पूर्ण विरघळण्यासाठी काही वेळा सात ते आठ दिवसही लागतात. मात्र नंतर त्याचा उपयोग खत म्हणून करता येतो.
२ शाडू मातीची मूर्ती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विरघळल्यानंतर हे पाणी खत म्हणून घराच्या आवारातील बागेला टाकता येते. त्याचा खत म्हणूनही वापर होतो.
इन्फो...
४८ तासांत विरघळते मूर्ती
खाण्याच्या सोडा वापरण्याचे आवाहन करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते खाण्याचा सोडा वापरून निर्गत करण्यास वेळ लागत नाही. साधारणत: ४८ तास वेळ लागतो, असे सांगितले जाते. मात्र काही तज्ज्ञांच्या मते हा आयडल कालावधी आहे. प्रत्यक्षात सात ते आठ दिवसांनी मूर्ती विरघळली जाते.
इन्फो..
शाडू मातीच्याच मूर्ती वापरा..
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती त्यावरील रासायनिक रंग आणि ते नष्ट करण्यासाठी रासायनिक रंगाचा वापर याचा विचार केला, तर अशा प्रकारे रसायनाला प्रतिकार करण्यासाठी रसायन वापरण्याऐवजी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करायला हवा. तो अधिक पर्यावरणपूरक ठरेल.
- मयूर मोरे, मिट्टी फाउंडेशन