माझी नार्कोटेस्ट करा, तयार आहे; मंत्री दादा भुसे यांचं आव्हान
By संजय पाठक | Published: October 19, 2023 04:04 PM2023-10-19T16:04:56+5:302023-10-19T16:05:10+5:30
ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी दादा भुसे यांनी फोन केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला हाेता.
नाशिक- ड्रग्जमाफिया ललित पाटील याला अटक झाल्यानंतर हे प्रकरण राजकीय पटलावर आणखीनच गाजण्याची चिन्हे आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर ललित पाटील यांच्या संबंधाचा आरोप असून त्याअनुषंगाने भुसे यांनी माझी नार्कोटेस्ट करा मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे आव्हान दिले आहे.
ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी दादा भुसे यांनी फोन केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला हाेता. त्यानंतर या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. ठाकरे गटाने या ड्रग्जविरोधात कारवाईच्या मागणीसाठी येत्या उद्या मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली असून ललित पाटीलला शोधल्यानंतर वास्तव बाहेर येईल असे दादा भुसे यांनी नमूद केले हेाते.
आता त्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्यावर राजकीय हेतूने प्रेरीत आरोप होताहेत आणि आपण कोेणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे नमूद केले आहे. अमलीपदार्थ विरोधी चळवळ राबविण्यासाठी मी पुढाकार घेतला असून
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. येत्या आठ दिवसांत अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी कारवाई झालेली दिसेल असे भुसे यांनी सांगून अवैध धंदे चालकांना कुठेही आश्रय दिला जाणार नाही, असेही भुसे यांनी म्हटले आहे.