सहकारातील झालेल्या चुकांना माफी नाही : दादा भुसे जिल्हा बॅँकेसह बाजार समित्यांमधील दोषींवर कारवाईचे संकेत;
By admin | Published: December 7, 2014 01:18 AM2014-12-07T01:18:17+5:302014-12-07T01:18:52+5:30
नाशकात जल्लोषात स्वागत
नाशिक : सहकार व पणन राज्यमंत्रिपदी निवड झालेल्या दादा भुसे यांनी जिल्हा बॅँकेतील कथित कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणी तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जर चुकीचे काम झाले असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. भुसे यांच्या वक्तव्यामुळे जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळातील माजी आमदार व माजीमंत्र्यांसह अनेकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कथित भ्रष्टाचार व अपहारांबाबतही चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर मालेगावला जात असताना आधी त्यांनी घोटी (इगतपुरी) येथे भेट दिली व नंतर नाशिक येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एकीकडे सहकार राज्यमंत्रिपदी निवड होत असताना दुसरीकडे मालेगावातील २८ सहकारी संस्था अवसायानात काढण्याचा निर्णय होऊन प्रशासक नियुक्ती झाल्याबाबत हा योगायोग आहे काय? तसेच जिल्हा बॅँकेतील कथित कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणी माजी संचालकांची सुरू असलेल्या चौकशीला बासनात बांधून ठेवल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, निश्चित सहकार हे सहकार्याने चालविण्यासाठी असते मात्र, दुर्दैवाने सहकाराला सहकार्याने चालवित नाहीत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेसह कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील कथित घोटाळे व अपहारप्रकरणी कोणालाही माफ केले जाणार नाही. चुकीचे काम झाले असेल, तर त्यांच्यावर कारवाई होईलच. कसमादे पट्ट्यातील पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी गोदावरी व तापी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडविण्याची कार्यवाही करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. आम्ही आधी जनतेचे प्रतिनिधी असून, जनतेच्या कामांसाठी सदैव पाठपुरावा करू. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण सरकार दरबारी पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी) इन्फो.. सिंहस्थासाठी केंद्राकडे पाठपुरावा सिंहस्था कुंभमेळा सहा महिन्यांवर येऊन ठेपला असून, कामे संथगतीने सुरू आहेत. सिंहस्थाच्या कामांना निधी उपलब्ध होत नसून या निधीसाठी आपण केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. सिंहस्थाच्या कामांना गती देण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी राज्य सरकार उपलब्ध करून देईलच. मात्र केंद्र सरकारकडूनही हा निधी तत्काळ उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.