शाहीमार्गावर वाद नको, तोडगा काढा
By admin | Published: February 1, 2015 12:07 AM2015-02-01T00:07:31+5:302015-02-01T00:07:40+5:30
प्रश्न कुंभमेळ्याचा : जागतिक दर्जाच्या सोहळ्यात नाशिकची प्रतिष्ठा पणाला; मतभेद टाळण्याचे आवाहन
पंचवटी - गेल्यावर्षी कुंभमेळ्यात महापर्वणीच्या दिवशी साधू-महंतांची शाही मिरवणूक सुरू असतानाच सरदार चौकात झालेली चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याने या धार्मिक सोहळ्यास गालबोट लागले. त्यातून नव्या पर्यायी शाहीमार्गाची चर्चा सुरू झाली. तथापि, आधी त्यास साधु- महंतांनी विरोध केला, आता त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावाला अनुकूलता दिली, तर पंचवटीतीलच सिंहस्थ ग्राम समितीने विरोध केला आहे. त्यातून आता दोन गट पडले आहेत. जुना पारंपरिक मार्ग बदलू नका असा आग्रह समितीत धरला जात असताना दुसरीकडे त्यास विरोधही सुरू आहे. त्यामुळे आता यातून सामंजस्याने तोडगा काढा, अशी मागणी दोन्ही गटांतून पुढे येत आहे.कुंभमेळा म्हटला की, वाद प्रवाद आले. असेच समीकरण आता झाले आहे. साधुग्रामची जागा असो अथवा शाहीमार्गातील बदल. प्रत्येकवेळी वाद- विवाद तर होतातच, परंतु यंदा कोर्टबाजीही झाली आहे. कोर्टातील वाद शमत असताना आता पर्यायी शाहीमार्गाचा नवाच वाद सुरू झाला आहे. गेल्या कुंभमेळ्यात शाही मिरवणूक सुरू असताना ज्या सरदार चौकात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. त्या भागात रुंदीकरण करणे सोपे नाही, त्यामुळे शाही मिरवणूक तेथून न नेता गणेशवाडीतून गाडगे महाराज पुलाखाली आणि तेथून रामकुंडावर नेण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने मांडला. त्यास सुरुवातीला साधु- महंतांनी विरोध केला. परंतु नंतर त्यांचा विरोध मावळला आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत साधु-महंतांनी पर्यायी मार्गास मान्यता दिली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असताना आता अचानक सिंहस्थ ग्रामोत्सव समिती पुढे आली आणि त्यांनी नव्या शाहीमार्गामुळे परंपरा खंडित होईल तसेच अन्य काही मुद्दे मांडले. विशेष म्हणजे त्यांचा जसा या विषयाला विरोध तसाच विरोध ग्रामोत्सव समितीने केल्याने हा वादही चांगलाच रंगू लागला आहे. मुळात मेळा आयोजित करणारे जिल्हा प्रशासन आणि आखाडे हे एकदा राजी झाल्यानंतर ग्रामोत्सव समितीचा विरोध कशासाठी असा प्रश्न उपस्थित झाला असून, त्याच अनुषंघाने मतेमतांतरे व्यक्त होत आहेत. कुंभमेळ्यासाठी हाच मार्ग निवडा अथवा दुसरा पर्यायी, परंतु दुर्घटना घडू देऊ नका, अशाच प्रतिक्रिया परिसरातील नागरिक आणि त्याच्याशी संबंधित घटकांनी व्यक्त केल्या आहेत.