अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये : नरेंद्राचार्य महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:31 AM2018-11-16T01:31:10+5:302018-11-16T01:31:25+5:30
देवाची श्रद्धेने भक्ती करावी, मात्र अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. अंगारे, धुपारे यांच्यावर विश्वास ठेवल्यास मनुष्य अंधश्रद्धेचा बळी ठरतो. भोंदूगिरीला बळी पडू नये. देवाला बकरे, कोंबडे यांचा प्रसाद लागत नाही. देव भक्तीचा भुकेला आहे. देवाला जात-पात नाही, असे प्रतिपादन रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.
पंचवटी : देवाची श्रद्धेने भक्ती करावी, मात्र अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. अंगारे, धुपारे यांच्यावर विश्वास ठेवल्यास मनुष्य अंधश्रद्धेचा बळी ठरतो. भोंदूगिरीला बळी पडू नये. देवाला बकरे, कोंबडे यांचा प्रसाद लागत नाही. देव भक्तीचा भुकेला आहे. देवाला जात-पात नाही, असे प्रतिपादन रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.
आशेवाडी येथे जनम संस्थांच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे आयोजित समस्या मार्गदर्शन व प्रवचन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना महाराज पुढे म्हणाले की, जो संतांच्या वचनाप्रमाणे वागतो त्यास देवाची प्रचिती येते. जीवन जगण्यासाठी बुद्धीचा वापर करून मनुष्याने प्रपंच करावा. नीटनेटका प्रपंच कसा करायचा हे सद्गुरू सांगत असतात. जीवनात येणारे आनंदाचे, दु:खाचे प्रसंग, मनुष्याने कसे वागावे हेदेखील सद्गुरू सांगत असतात. संतांच्या संगतीत जो राहतो तो संतांप्रमाणेच वागतो त्यामुळे नेहमी सद्गुरूंच्या संगतीत रहावे. प्रत्येकाने गुरू करावा. यावेळी स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी ३०८ भक्तांना साधक दीक्षा दिली. जीवनात महत्त्वाचे काम करण्यासाठी व्यक्तीला मनुष्य देह मिळाला आहे. प्रपंच, समाजाचे ॠण फेडणे, मोक्ष मिळवणे हे तीन कामे होत. प्रपंचात मुलाबाळांवर प्रेम करावे, रडत रडत प्रपंच करू नये, आनंदी जीवन जगावे, आनंद झाला की हुरळून जावू नये अन् दु:खात घाबरू नये, असे महाराज म्हणाले.