विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे लादू नका : दिलीप भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:32 AM2018-06-17T00:32:26+5:302018-06-17T00:32:26+5:30
विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये १४ ते ३० वयोगटांमधील आयुष्य आव्हानात्मक असते. त्यामुळे या काळात त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे टाकण्यापेक्षा त्यांना आव्हानांचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन करा. कारण या काळात अनेक संधी येत असतात, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी व्यक्त केले.
आडगाव : विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये १४ ते ३० वयोगटांमधील आयुष्य आव्हानात्मक असते. त्यामुळे या काळात त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे टाकण्यापेक्षा त्यांना आव्हानांचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन करा. कारण या काळात अनेक संधी येत असतात, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी व्यक्त केले. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने शनिवारी, (दि.१६) ‘न्याय व शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यानाचे वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, धर्मादाय सहआयुक्त प्रदीप घुगे, मुख्य जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, विश्वस्त चांगदेव होळकर, विश्वस्त अशोक मर्चंट, अॅड. प्रफुल्ल शाह, यांची प्रमुख उपस्थिती होते.
यावेळी भोसले म्हणाले की, स्पर्धेच्या काळात पालकांच्या व शिक्षकांच्या अपेक्षांचे ओझे मुलांच्या डोक्यावर असते. त्यामुळे शिक्षक व पालकांनी मुलांकडून अपेक्षा करणे गैर नाही, पण त्या अपेक्षांचा ताण मुलांवर पडणार नाही. याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून मार्गदर्शन केल्यास निश्चित यशस्वी होऊ शकतील. संस्थेची माहिती प्राचार्य केशव नांदूरकर यांनी दिली. सूत्रसंचालन एस. टी. पवार यांनी केले.