पैशाचे ओंगळवाणे प्रदर्शन नको

By admin | Published: January 25, 2015 12:02 AM2015-01-25T00:02:09+5:302015-01-25T00:02:30+5:30

प्रकाश आमटे : जीवनशैली सप्ताहाचे उद्घाटन

Do not display money laundering | पैशाचे ओंगळवाणे प्रदर्शन नको

पैशाचे ओंगळवाणे प्रदर्शन नको

Next

नाशिक : समृद्ध जीवनातून निवृत्ती घेऊन समाजकार्यात उतरण्यासाठी मनाची तयारी आवश्यक असते; मात्र प्रत्येकानेच असे करण्याऐवजी किमान आपल्या काही गरजा कमी केल्या आणि पैशांचे ओंगळवाणे प्रदर्शन करणे सोडले, तरी ते मोठे समाजकार्यच होऊ शकेल, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक डॉ.
प्रकाश व डॉ. मंदाताई आमटे यांनी दिला.
सर्वोदय परिवार, निर्मल ग्राम निर्माण केंद्र, मराठी विज्ञान परिषद व लोकाधार या संस्थांच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘जीवन उत्सव’ उपक्रमातील जीवनशैली सप्ताहाचे उद्घाटन आमटे दाम्पत्याच्या हस्ते महाकवी कालिदास कलामंदिरात झाले. कार्यक्रमात श्रीकांत नावरेकर व पराग मांदळे यांनी त्यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आमटे यांनी ते स्वत: ज्या जीवनशैलीत जगले, त्याची अनेक उदाहरणे यावेळी दिली. डॉ. मंदाताई म्हणाल्या की, नागपूरमध्ये सर्वसामान्य घरात वाढल्यानंतर हेमलकसासारख्या दुर्गम ठिकाणी जाऊन जीवनशैलीत बदल घडवणे अवघड होते. आदिवासींमध्ये राहायला गेल्यानंतर तिथल्या आदिवासींकडे भर थंडीतही कपडे नसल्याचे पाहून आम्हीही स्वेटरसारखे अनावश्यक कपडे परिधान करणे सोडले. चाळीस वर्षांपासून सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी चार किलोमीटर
चालण्याचा व्यायाम आजही अव्याहत सुरू आहे. मुलांवरही आमच्या जगण्यातूनच संस्कार झाले. सामाजिक काम त्यांच्यावर लादले नाही, तर मुले त्यांच्या मर्जीने त्यात सहभागी झाली.
डॉ. प्रकाश म्हणाले की, आमची जीवनशैली साधी होती, तरीही आदिवासींच्या तुलनेत आम्ही खूप सुखी असल्याचे वाटत होते. दारू न पिणे, चोरी न करणे, पैशांचा अपहार न करणे, परस्री मातेसमान मानणे असे किमान नियम संस्थेत सर्वांनी पाळावयाचे ठरवले. सगळे कार्यकर्ते शहरातून आले असूनही त्यांनी स्वेच्छेने साधी जीवनशैली अंगीकारली; पण आम्ही जगताना काहीही ‘मिस’ केले, असे आता वाटत नाही. कारण कामात समाधान होते. आपल्यावरील सिनेमामुळेही लोकांवर चांगला परिणाम होत असून, ते स्वत:हून जीवनशैलीत बदल करीत आहेत.
व्यासपीठावर वासंती सोर, डॉ. रामदास गुजराथी उपस्थित होते. डॉ. प्रकाश व डॉ. मंदाताई यांच्या
हस्ते चरख्यातून सूतकताई करून ‘जीवन उत्सव’चे उद्घाटन करण्यात आले. अजित टक्के यांनी प्रास्ताविक केले. मुकुंद दीक्षित यांनी परिचय करून देताना हेमलकसा येथील थरारक प्रसंग सांगितले. मीना मांदळे यांनी सूत्रसंचालन केले. संगीता मुठाळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Do not display money laundering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.