‘मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:33 AM2019-06-04T01:33:53+5:302019-06-04T01:35:35+5:30
: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, ‘मुलगा वंशाचा दिवा, तर मुलगी वंशाची पणती’, ‘मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको’ अशा विविध समाजप्रबोधनपर घोषवाक्यांच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येपासून देशाच्या लेकींचे संरक्षण करण्याचा जागर होत असला तरीदेखील समाज अद्याप परिपक्व होत नसल्याचे अनेकदा विविध घटनांमधून समोर येते.
नाशिक : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, ‘मुलगा वंशाचा दिवा, तर मुलगी वंशाची पणती’, ‘मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको’ अशा विविध समाजप्रबोधनपर घोषवाक्यांच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येपासून देशाच्या लेकींचे संरक्षण करण्याचा जागर होत असला तरीदेखील समाज अद्याप परिपक्व होत नसल्याचे अनेकदा विविध घटनांमधून समोर येते.
या पाच महिन्यांत शहरात तीन ठिकाणी जन्मलेल्या ‘नकोशी’ला बेवारस सोडून अज्ञात मातांनी पळ काढल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर जन्मदात्या आईनेच दहा दिवसांच्या चिमुकलीचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.३) उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
शहरी भागात नागरिकांच्या संवेदना मृत झाल्याचा प्रत्यय आणून देणाऱ्या या घटनांमुळे समाजाच्या वैचारिक स्तराबाबत चिंता व्यक्त होत आहे. ८ मार्च जागतिक महिला दिनी महिला सबलीकरणाचा जागर होत असताना फाळके स्मारक परिसरात नवजात बालिका आढळून आली होती. या घटनेला दोन दिवस होत नाही तोच पुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतनगरजवळील घरकुल प्रकल्पाशेजारी असलेल्या नंदिनी नदीच्या काठावर मोकळ्या मैदानात अज्ञात महिलेने नुकतेच जन्माला आलेल्या स्त्री जातीच्या नवजात शिशुला रात्रीच्या सुमारास नागरिकांची नजर चुकवून रामभरोसे सोडून पळ काढल्याचे उघडकीस आले होते. या घटना मार्च महिन्यातच लागोपाठ घडल्या होत्या.
त्यानंतर काही दिवसांनी सिडकोमधील बडदेनगरच्या एका सोसायटीत जेमतेम पाच ते सहा महिने वाढ झालेले मनुष्य जातीचे अर्भक अज्ञातांनी बेवारसपणे टाकून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंध उघड होऊ नये म्हणून गर्भपात करून अपत्य जन्माची लपवणूक करण्याकरिता अज्ञात स्त्रीने सहा महिने वाढ झालेले अर्भक बेवारसपणे फेकून पळ काढला होता.
जन्मदात्रीकडून दाखविला गेला उकिरडा
मे महिन्याच्या १५ तारखेला भारतनगरजवळ वर्दळीच्या रस्त्यालगत एका कचºयाच्या उकिरड्यात स्त्री जातीचे नवजात शिशु एका महिलेला आढळून आले होते. देव तारी त्याला कोण मारी’ असे म्हटले जाते ते अगदी खरेच आहे, याची प्रचिती नाशिककरांना त्यावेळी आली. कारण जन्मदात्रीने नऊ महिने पोटात वाढविल्यानंतर नवजात बाळाला जन्म देत थेट उकिरडा दाखविला. कडकडीत उन्हात सुमारे पाच तासांहून अधिक वेळ कचºयाच्या वेढ्यात वर्दळीच्या रस्त्यालगत निपचित पडलेल्या या बाळाला अखेर नियतीनेच जीवदान दिले. या बाळाची प्रकृती उत्तम असल्याचा निर्वाळाही डॉक्टरांनी दिला आहे़