कर्तृत्ववान महिलांचा इतिहास विसरू नका : सिंधूताई सपकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:38 AM2019-05-23T00:38:25+5:302019-05-23T00:39:09+5:30
तथाकथित सुशिक्षित वर्गातील स्त्रियांकडून जगण्याच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला जातो. परंतु आजच्या युगात जगण्याचा आनंद घेताना आपली संस्कृतीशी नाळ तुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
नाशिक : तथाकथित सुशिक्षित वर्गातील स्त्रियांकडून जगण्याच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला जातो. परंतु आजच्या युगात जगण्याचा आनंद घेताना आपली संस्कृतीशी नाळ तुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ज्याला तुम्ही अडाणी म्हणता त्याच माय-बहिणींनी कर्तृत्वाने इतिहास घडविला आहे. त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी केले.
आई फाउंडेशन व प्रयत्न संस्था यांच्या वतीने मातृदिनानिमित्त कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. आमदार सीमा हिरे, भारती गमे, नलिनी कड, नीता कोशिरे उपस्थित होत्या.
याप्रसंगी विमल काळे, स्वाती पाटील, आशालता आडके, विमल धात्रक, गीताबाई ठाकरे, भिकूबाई बागुल, सखूबाई चुंबळे, फुलाबाई आहेर, आशा बनकर, पुष्पलता जेऊघाले, तुळसाबाई दाहिजे, मंगला शिंदे, सुनीता शिंदे, भगीरथी पाटील, मीराबाई रकिबे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सिंधूताई म्हणाल्या, शालिनतेने समाजाकडे बघितले पाहिजे, यावेळी महेश आडके, संदीप धात्रक, शिल्पा वाघ, पूजा शिनगार, पूनम पाटील, शिल्पा जेऊघाले, आकाश कोठारी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक महेश अहिरे तर सूत्रसंचालन प्रा. नितीन अहेर यांनी केले, तर संदीप धात्रक यांनी आभार मानले.
जीवनात अनेक संकटे येतात. कितीही मोठे संकट आले तरी न डगमगता त्याच्यावर पाय देऊन उभे रहा. जगा आणि जगू द्या, या आपल्या संस्कृतीने दिलेला विचार घेऊन वाटचाल करत रहा. जीवनात कितीही मोठे यश मिळाले, तरी मागे वळून पहायला शिका. शिक्षण घेताना संस्कार जपले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सोपान वाटपाडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान दिले.