ना छावणीला, ना दावणीला चारा मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 06:10 PM2019-01-21T18:10:41+5:302019-01-21T18:15:21+5:30
सचिन सांगळे। सिन्नर : दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याचा व चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ...
सचिन सांगळे।
सिन्नर : दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याचा व चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. माणसासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाची मदार आता शासनावर अवलंबून आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊन दोन महिने झाले आहे. परंतु अद्यापही शासनाने छावण्या व चारा डेपोही सुरू केले नाहीत. त्यामुळे दावणीला अन् छावणीला चारा नसल्याने बळीराजाचा जीव कासावीस झाला आहे.
गतवर्षी तालुक्यात जेमतेम स्वरूपात पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांना खरीप व रब्बी हंगामातील पिकांना मुकावे लागले. खरीप हंगामातील बाजरी, मका, सोयाबीन या पिकांच्या पेरण्यांमध्ये ७५ टक्केघट झाल्याने तसेच विहिरीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी यामध्येही ९० टक्के घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यात सरासरी ८० टक्केपेरण्या न झाल्याने यावर्षी शेतकºयांना चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी तालुक्यात परतीचा पाऊस पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही, त्याचाही परिणाम दिसून येत आहे. तालुक्यात व परिसरात कोठेही चारा नसल्याने पंधरा ते वीस किलोमीटरहून उपलब्ध होईल तेथून व मागणीप्रमाणे खरेदी करून चाºयाची गरज भागवली जात आहे. शेतकºयांच्या हातातून पावसाअभावी खरीप व रब्बी हंगाम गेल्याने त्याचा परिणाम शेतकºयांना मिळणाºया चाºयावर झाल्याचे चित्र आहे. शेजारील तालुक्यात मका पिकांचे प्लॉट विकत घेऊन त्याचा चारा म्हणून साठवणूक करण्याचे काम शेतकरी करत आहे. तसेच सध्या उसाचा गळीत हंगाम सुरू असल्याने उसाच्या वाड्यांना मोठ्या प्रमाणात शेतकºयांकडून मागणी होत आहे. दुष्काळात पशुपालन करून गाय, म्हशींच्या माध्यमातून शेतकºयांनी पूरक दूध व्यवसायास पसंती दिली आहे. तालुक्यात व परिसरात साहजिकच चाºयाची उपलब्धता नसल्याने आगामी काळात पाच ते सहा महिने जनावरे दावणीला सांभाळायची कशी, असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे शासनाने किमान जनावरांच्या चारा - पाण्याची सोय करावी, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात १५ गावे व १६६ वाड्यांना ३१ टॅँकरने पाणीपुरवठा
तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने १५ गावे व १६६ वाड्या-वस्त्यांना दररोज ७८ फेºया करून पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३१ टॅँकर सिन्नर तालुक्यात सुरू आहेत. पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा तालुक्यातील वाड्या- वस्त्यामधील ग्रामस्थांना सोसाव्या लागत आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. तालुक्यातील ५० हजारांच्या आसपास नागरिकांची तहान टॅँकरद्वारे भागविली जात आहे. दिवसेंदिवस तालुक्यात टंचाईचे गावे आणि टॅँकरचे प्रस्ताव वाढू लागल्याने या पुढील काळात प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. दुसरी समाधानाची बाब म्हणजे धरणांमध्ये असलेल्या शिल्लक पाण्यावर अवलंबून असणाºया नळपाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू असल्याने त्या परिसरातील पिण्याच्या पाण्याची अडचण दूर झाली आहे.
दुग्ध व्यवसाय संकटात
तालुक्यातील सर्वच भागात शेतीला जोडव्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करत आहे. मात्र गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने चाराटंचाई निर्माण होऊ लागल्याने दूध उत्पादक शेतकºयांना चारा वाढीव किमतीने विकत घ्यावा लागत आहे. दूध व शेती व्यवसायातून मिळणाºया उत्पन्नावर शेतकºयांचे वर्षाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचा व चाºयाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत येत असल्याने शेतकºयांचे आर्थिक बजेट कोलमडू लागले आहे. एकंदरीत दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई, चाराटंचाई आणि त्यातच वाढती महागाई यामुळे दुग्धव्यवसायाला घरघर लागल्याचे चित्र आहे.
तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. परंतु अद्यापही शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्या नाहीत. शासकीय चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्ग भरडला जात आहे. शेतकºयांच्या खºया समस्यांचा विचार शासन करत नाही. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने चारा छावण्या सुरू करण्याची गरज आहे. पूर्व भागात प्रामुख्याने चाराटंचाई व पिण्याच्या पाण्यामुळे जनावरांची उपासमार होत आहे. शासनाने तातडीने दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात अन्यथा शेतकºयांसमवेत आंदोलन छेडण्यात येईल.
- बाळासाहेब वाघ,
तालुकाध्यक्ष, राष्टÑवादी कॉँग्रेस
१९७२ पेक्षा भयानक दुष्काळी परिस्थती यंदा निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला खरा, मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही झाली नाही. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. माझ्याकडे छोटे-मोठे सात जनावरे आहे. त्यांच्या चाºयाचा प्रश्न मला दररोज सतावत आहे. शासनाने चारा छावण्या सुरू करून चाºयाची व्यवस्था करावी.
- सोमनाथ आव्हाड,
पशुपालक, देशवंडी
फोटो क्र.- 21२्रल्लस्रँ04, 21२्रल्लस्रँ05