तिकीट मिळो ना मिळो, पॅनलचा प्रचार

By admin | Published: January 24, 2017 11:16 PM2017-01-24T23:16:48+5:302017-01-24T23:17:09+5:30

पक्षविरहित पॅनलनिर्मिती : बंडखोरी होण्याची शक्यता

Do not get ticket, get promoted panel | तिकीट मिळो ना मिळो, पॅनलचा प्रचार

तिकीट मिळो ना मिळो, पॅनलचा प्रचार

Next

नाशिक : यंदा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने महापालिकेची निवडणूक होत असून, एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. सद्यस्थितीत राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असल्या आणि युती-आघाडीच्या चर्चा चालू असल्या तरी तिकिटाच्या भरवशावर न राहता प्रभागामध्ये विविध पक्षांच्या इच्छुकांनी एकत्र येत परस्पर पॅनलची निर्मिती करत प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवातही करून दिली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यंदा २९ प्रभागांमधून प्रत्येकी चार तर दोन प्रभागांमधून प्रत्येकी तीन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे एका प्रभागात प्रत्येक राजकीय पक्षाला चार उमेदवार द्यायचे आहेत. मात्र, चारही उमेदवार देताना त्यांची निवडून येण्याची क्षमताही पाहावी लागणार आहे. निवडणुकीत चार उमेदवारांचे पॅनलच चालविले जाणार असल्याने आपल्या सोबत कोण आणि किती सशक्त उमेदवार आहे, यावरच संबंधितांचे विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. सद्यस्थितीत राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. दि. २७ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे दि. २७ जानेवारीनंतरच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची यादी घोषित होण्याची शक्यता आहे. परंतु, राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळेलच, या अविर्भावात न राहता काही इच्छुकांनी आपल्या प्रभाग स्तरावर निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांसोबत आपली मोट बांधण्याचे काम सुरू केले आहे. काही प्रभागात मनसे, राष्ट्रवादी, सेना, कॉँग्रेस अशा चार भिन्न पक्षांचे इच्छुक एकत्र येऊन प्रत्यक्ष प्रचारही करत आहेत. एरव्ही एकमेकांवर चिखलफेक करणारे विविध राजकीय पक्षांचे इच्छुक एकत्र फिरून प्रचार करत असल्याने मतदारही बुचकळ्यात पडत आहे. यदाकदाचित सदर इच्छुकांना त्या-त्या पक्षांची अधिकृत उमेदवारी मिळालीच तर पक्षचिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यावेळी प्रभागात परस्पर पॅनल निर्माण करून प्रचार करणाऱ्या इच्छुकांची त्यावेळी कोंडी होण्याची शक्यता आहे. अन्यथा, प्रभागातीलच एकाच पक्षाचे उमेदवार परस्परविरोधी प्रचार करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना बंडखोरीचा  सामना करावा लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Do not get ticket, get promoted panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.