कर्माचा त्याग करू नये : स्वरूपानंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:47 AM2018-05-08T00:47:01+5:302018-05-08T00:47:01+5:30
कर्म हे जीवनाचे अविभाज्य जिवंतपणाचे लक्षण आहे. त्यामुळे कर्म हे अटळ आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती, संकटे, दु:ख, आघात झाले तरी कोणीही कर्माचा त्याग करू नये, असे प्रतिपादन पुण्याच्या श्रुतीसागर आश्रमाचे आचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.
नाशिकरोड : कर्म हे जीवनाचे अविभाज्य जिवंतपणाचे लक्षण आहे. त्यामुळे कर्म हे अटळ आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती, संकटे, दु:ख, आघात झाले तरी कोणीही कर्माचा त्याग करू नये, असे प्रतिपादन पुण्याच्या श्रुतीसागर आश्रमाचे आचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले. के.जे. मेहता हायस्कूलमध्ये सहावे पुष्प गुंफताना स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले की, तमोगुण वाढल्याने इच्छाशक्ती, दोष निवारण करण्याची शक्ती कमी होते. भगवान श्रीकृष्णाने गितेमधून अर्जुनाच्या माध्यमातून प्रत्येकाला उपदेश दिला आहे. कोणते कर्म करावे व करू नये, याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यामुळे काय करावे व काय करू नये हे त्याच्या इच्छा स्वातंत्र्यावर अवलंबून असते. बहिरंग व अंतरंग जीवन शुद्ध करायचे असेल तर आचार-विचाराचा पाया तितकाच शुद्ध, भक्कम असला पाहिजे, असे प्रतिपादन स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले. कुटुंबव्यवस्था जिवंत ठेवायची असेल तर आचार धर्म पाळलाच पाहिजे. काय दिले परमेश्वराने असा विचार, प्रश्न जेव्हा मनात निर्माण होतो तेव्हा तुमची आचारधर्मावर श्रद्धा, विश्वास नाही किंवा कमी झाला आहे हे स्पष्ट होते. दोन तीरांमध्ये नदी अखंड पुढे वाहत असते. नदीचा प्रवाह महत्त्वाचा असला तरी त्यापेक्षा दोन्ही तीर अधिक महत्त्वाचे आहे.