लहानसहान दोषांची उपेक्षा करू नये
By admin | Published: July 21, 2016 10:49 PM2016-07-21T22:49:08+5:302016-07-21T22:50:08+5:30
चतुर्मास प्रवचन : आचार्य रत्नसेनसुरी महाराज यांचे प्रतिपादन
नाशिकरोड : जहाजाला पडलेले छोटेसे छिद्र हे त्या जहाजाला समुद्रात बुडवू शकते. अशाच प्रकारे जीवनामध्ये लहानसहान दोषांची उपेक्षा करता कामा नये, असे प्रतिपादन आचार्य रत्नसेनसुरी म.सा. यांनी केले
जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ नाशिक यांच्या वतीने टिळकवाडी महावीर सोसायटी येथील भाविक आराधना भवनमध्ये चतुर्मासनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना आचार्य रत्नसेनसुरी म.सा. म्हणाले की, कपड्याला पडलेले लहानसे छिद्र त्या कपड्याला मूल्यहीन बनविते, भिंतीला पडलेली एक छोटीशी भेग भविष्यात ती भिंत पडण्यास कारणीभूत ठरू शकते. त्याचमुळे आपल्या नजरेमध्ये आपल्याला जो दोष छोटा वाटत असला तरी भविष्यात तोच दोष भयंकर रूप धारण करू शकतो. जी व्यक्ती शुल्लक बाबतीत खोटे बोलते तीच व्यक्ती उद्या मोठ्या गोेष्टीबाबत खोटे बोलू शकते किंवा जी व्यक्ती सामान्य गोष्टीसाठी भांडण करू शकते अन् तीच व्यक्ती उद्या मोठी भांडखोर बनल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे प्रत्येकाने अहंकारापासून स्वत:ला सांभाळले पाहिजे, असे आचार्य रत्नसेनसुरी म.सा. यांनी सांगितले.
भस्मकाचा रोगी भले केवढाही आहार घेतला तरी तो शिडशिडीतच राहतो, कारण त्याने घेतलेल्या आहारापासून रक्त बनत नसल्यामुळे तो आहार असाच जळून खाक होत असतो. याचप्रकारे मोक्ष मार्गामध्ये प्रगती साधण्यासाठी केवढीही साधना केली गेली, त्याग, तप, ज्ञान, ध्यान असे कठोरपणे केले पण या सर्व साधनेबरोबर जेव्हा अहंकार जोडला जातो तेव्हा तो या सर्व साधनेला खाऊन टाकतो. अहंकारासह कितीही साधना केली गेली तरी ती आराधना, साधना आत्म्याला मोक्ष मिळवून देण्यास समर्थ ठरत नाही. अहंकार हा आत्महत्त्येचा भस्मक रोग आहे, असेही आचार्य रत्नसेनसुरी म.सा. यांनी सांगितले. (प्रतिनिधी)