माझ्या नादी लागाल तर याद राखा! जरांगेंचा भुजबळांना इशारा, शांतता रॅलीचा समारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 12:29 PM2024-08-14T12:29:50+5:302024-08-14T12:31:34+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या राज्यस्तरीय शांतता रॅलीचा समारोप मंगळवारी नाशिकमध्ये झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आता भाजप नेत्यांच्या मागे लागून मराठ्यांमध्ये भांडणे लावत आहेत. यापुढे माझ्या नादी लागाल तर याद राखा. येवल्यात येऊन पराभूत करून दाखवू, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी भुजबळ यांना दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या राज्यस्तरीय शांतता रॅलीचा समारोप मंगळवारी नाशिकमध्ये झाला. सीबीएस चौकात बोलताना जरांगे म्हणाले, की कडवटपणा काय असतो तो नाशिकच्या समाजबांधवांनी शिकविला. वेदना सरकारला अजूनी समजत नाहीत. पक्षाला, नेत्याला बाप मानण्यापेक्षा जातीला बाप माना.
लढायचं की पाडायचं याचा फैसला २९ला
येत्या २९ ऑगस्ट रोजी अंतरवली सराटीत सर्व समाजबांधवांनी यावे. त्या ठिकाणी आपण विधानसभा निवडणूक लढायची की उमेदवारांना पाडायचे, असा निर्णय घेऊ, असे जरांगे-पाटील यांनी सभेत आवाहन केले.