पोषण आहाराची रक्कम मुलांच्या खात्यावर टाकू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:06+5:302021-06-29T04:11:06+5:30
निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे बँकेत खाते नाही, ज्यांचे आहे त्या खात्यात व्यवहार नसल्याने दंड हाेऊ शकताे. लहान मुलांच्या नावे बँक ...
निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे बँकेत खाते नाही, ज्यांचे आहे त्या खात्यात व्यवहार नसल्याने दंड हाेऊ शकताे. लहान मुलांच्या नावे बँक खाते उघडत नाही, कोरोना संसर्गामुळे या योजनेवर अंमलबजावणी कठीण ठरणार आहे म्हणून शासनाने हा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांना तांदूळ व अन्य खाद्यपदार्थ वाटप करावे, अशी मागणी उर्दू शिक्षक संघाच्या वतीने राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण संचालक जगन्नाथ जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे खाते नसल्यास बँक खाते उघडावे. ते आधारशी लिंक करावे, असे आदेश शिक्षण संचालनालयाने शाळांना दिले. आधार कार्ड लिंक करून दि. ९ जुलै २०२१ पर्यंत बँक खात्याची सर्व माहिती अद्ययावत करायची आहे. दुसरीकडे अल्पसंख्याक, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसह अन्य शिष्यवृत्ती जमा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून शिक्षकांनी खाते उघडले. मात्र, खात्यात किमान सहा महिन्यांतून एकदा व्यवहार होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे खाते बंद झाले. किमान शिल्लक नसल्याने दंड होताे. त्यामुळे नवीन रक्कम जमा हाेताच सर्वप्रथम दंड आकारल्याने लाभार्थींचे नुकसान होऊ शकते. यामुळे पालकांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असे साजिद अहमद यांचे म्हणणे आहे.
उन्हाळी सुटीच्या दोन महिन्यांतील अंदाजित ३५ दिवस गृहीत धरल्यास पहिली ते पाचवीसाठी दरदिवशी ४.४८ रुपये याप्रमाणे एकूण फक्त १५६ रुपये ८० पैसे आणि सहा ते आठसाठी दर दिवशी ६.७१ रुपये प्रमाणे एकूण फक्त २३४ रुपये ८५ पैसे जमा हाेतील. एवढ्या कमी रकमेसाठी बॅंक खाते सुरू ठेवणे गरीब विद्यार्थ्यांसाठी अवघड हाेणार आहे.