बालकांचा ताप अंगावर काढू नका; कोरोना किंवा डेंग्युही असू शकतो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:13 AM2021-08-01T04:13:36+5:302021-08-01T04:13:36+5:30
नाशिक : पहिली लाट थंडावल्यानंतर सर्वच यंत्रणांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केल्याचे तज्ज्ञांचे मत ...
नाशिक : पहिली लाट थंडावल्यानंतर सर्वच यंत्रणांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे, तसेच तिसरी लाट ही ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तवली आहे, तसेच या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ज्यांच्या लसीकरणाला अद्याप प्रारंभच झालेला नाही, अशा १८ वर्षाखालील मुले आणि बालकांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बालकांचा ताप अंगावर काढू नका, तो कोरोना किंवा डेंग्युचादेखील असू शकेल, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी १८ वर्षाखालील मुलांची, बालकांची संख्या २५ टक्क्यांहून अधिक आहे, तसेच या वयोगटातील मुलांचा लसीकरणात समावेश झाला नाही. त्यामुळे हा मोठा वर्ग असुरक्षित व धोकादायक स्थितीत आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. लसीकरणामुळे प्रौढांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी होऊ शकते; पण लहानांमध्ये ते वाढू शकते. मुलांना जास्त त्रास होत नसला; तरीही ते संसर्गाचे वाहक असण्याची शक्यता असल्याने तो धोकादेखील मोठा ठरू शकतो, तसेच बालकांना ताप हा साधा किंवा नेहमीचा व्हायरल फ्लू किंवा पावसात भिजल्यानेच आला असण्याची शक्यता गृहित धरणे अयोग्य ठरू शकते. त्यामुळे बालकांचा ताप हा डेंग्यु किंवा कोरोनाचा नाही ना, याबाबत खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. ही दोन्ही संकटे सहजरीत्या पार करण्यासाठी सर्वात आधी आपल्यासोबतच आपण लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आतापासूनच प्रयत्नशील असणं गरजेचे झाले आहे.
डासांपासून बचाव
लहान मुलांची त्वचा नाजूक असल्यामुळे मच्छर चावल्यावर त्यांना खूप त्रास होतो, त्वचा लालसर होते आणि कधी कधी सूजदेखील येते. यापासून बचाव करण्यासाठी मुलाला मॉस्किटो नेटच्या आतमध्ये ठेवा. बाळाच्या खोलीचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवून मच्छर आतमध्ये येणार नाहीत. नैसर्गिकरीत्या घरच्या घरी तयार केलेले कीटकनाशक मच्छर मारण्यासाठी वापरावे. संध्याकाळच्या वेळेस लहान मुलांना किंवा नवजात बालकांना घराबाहेर घेऊन जाऊ नये. जर घराबाहेर जाणे अत्यावश्यक असेल तर अंग झाकेल असे कपडे घालूनच मुलांना बाहेर नेणे आवश्यक आहे.
इन्फो
ताप आला म्हणजे कोरोना, असे नाही, पण...
घरातील मुलांना, बालकांना ताप आला किंवा अन्य सर्दीसह अन्य लक्षणे दिसली म्हणजे तो कोरोनाच असेल असे नाही; मात्र ताप आल्यावर त्वरित डॉक्टारांकडे जाऊन सल्ला घेणेच श्रेयस्कर ठरते. सध्या डेंग्युच्या रुग्णसंख्येतही वाढ होत असल्याने ती शक्यतादेखील नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच दक्षता घेणे आवश्यक ठरते.
इन्फो
बालकांसाठी कोविड केअर सेंटर
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या दक्षतेसाठी शासनाने सर्व शासकीय, निमशासकीय, मनपा रुग्णालयांमध्ये बालकांसाठी कोविड केअर सेंटर सज्ज केले आहेत. तसेच बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्स समित्यांचे गठन करण्यात आले असून, सर्व खासगी बालरुग्णालयांनाही सज्जतेचे निर्देश देण्यात आले आहेत.
- मुलांना ताप, खोकला; तसेच श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- मुलांच्या नियमित लसीकरणाचे वेळापत्रक चुकवू नका.
- कच्च्या अथवा अर्धवट शिजवलेल्या मांसाचे सेवन करणे टाळावे आणि मुलांनाही करू देऊ नये.
- मुलांना सतत एकाच जागी बसवून न ठेवता त्यांच्या शारीरिक हालचाली वाढवून त्यांना सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहित करा.
-----------------
ही डमी आहे.