चांदोरीत बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 03:20 PM2019-09-03T15:20:19+5:302019-09-03T15:20:31+5:30
सायखेडा : नाशिक ते औरंगाबाद महामार्गावर चांदोरी - सायखेडा चौफुली येथे कोणतीही बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी ...
सायखेडा : नाशिक ते औरंगाबाद महामार्गावर चांदोरी - सायखेडा चौफुली येथे कोणतीही बस थांबत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी अचानक रास्ता रोको केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.
चांदोरी परिसरातून नाशिक,ओढा येथे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. गोदाकाठ परिसरात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सायखेडा येथे विद्यार्थी येतात. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रवास करतात. सकाळी विद्यार्थी येतात आणि दुपारनंतर पुन्हा घरी जातात, त्यामुळे या रस्त्याने धावणाऱ्या बसेस या विद्यार्थ्यांसाठी थांबल्या पाहिजे असे मुलांना वाटते मात्र बस वाहक आणि चालक आपल्या निश्चित केलेल्या ठिकाणी थांबतात. तर कधीकधी प्रवाशांनी गाडी पूर्ण भरली असेल तर थांबतही नाही. त्यामुळे वेळेवर शाळेत, कॉलेजमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होते. बस अभावी मुले पोहचतात दोन तास उशिरा तर परतीच्या प्रवासात तासंतास उभे राहूनही बस थांबत नसल्याने घरी उशिरा पोहचतात. त्यामुळे कुटुंबाच्या रोषाला सामोरे जावे लागते. म्हणून सायखेडा त्रिफुली, नागपूर फाटा, शिंपी टाकळी, चितेगाव फाटा, गोंडेगाव फाटा या ठिकाणी बस थांबली पाहिजे अशी मागणी अनेक दिवसांची आहे मात्र परिवहन महामंडळ यावर कोणतीही भूमिका घेत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अचानक रास्ता रोको केला. जवळपास अर्धा तास चालले आंदोलन आक्र मक पवित्रा घेताच सायखेडा पोलीस उपनिरीक्षक सोनवणे आणि माजी सरपंच संदीप टर्ले, संदीप गडाख, गणेश वाणी घटनास्थळी दाखल झाल्याने बस थांबण्यासाठी आगार प्रमुखांना निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.