आचारसंहितेचे उल्लंघन करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:24 AM2019-09-24T01:24:39+5:302019-09-24T01:24:56+5:30
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना करण्याबरोबरच नवीन कामांचा शुभारंभ, व्यक्तिगत लाभाच्या योजना सुरू करून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल,
नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना करण्याबरोबरच नवीन कामांचा शुभारंभ, व्यक्तिगत लाभाच्या योजना सुरू करून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व गट विकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला आहे.
जिल्ह्यात शनिवारपासून आचारसंहिता जारी झाली असून, जिल्हा परिषदेने तत्काळ त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांची वाहने जमा करण्याबरोबरच त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीचा राजकीय प्रचारासाठी वापर होऊ नये यासाठी दूरसंचारची सेवा खंडित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आवारातील पदाधिकारी, सदस्यांच्या नावाच्या कोनशिलाही झाकण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारची आचारसंहितेची अंमलबजावणी गावपातळीवर करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सर्व खातेप्रमुख व गट विकास अधिकाºयांना पत्रे दिले असून, त्यात आचारसंहितेचे तंतोतंत पालन करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. गावपातळीवर लागलेले राजकीय पक्षांचे फलक, झेंडे, बॅनर, पोस्टर्स ग्रामसेवकांच्या माध्यमातून काढण्यात यावे, त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या मासिक सभांमध्ये कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही याची कल्पना संबंधितांना द्यावी, नवीन कामांचा कार्यारंभ आदेश दिला जाणार नाही.
ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांची नाम फलके झाकण्यात यावे, व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा कोणालाही लाभ दिला जाणार नाही याची काळजी घेण्याबरोबरच, अधिकारी अथवा कर्मचाºयांकडून कोणताही उमेदवार अथवा राजकीय पक्षाचा प्रचार होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत. आचारसंहितेचा भंग झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाºयांवर निश्चित केली जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली आहे.