बेलभंडार देऊन शपथ घातली की मत पक्के !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:11 PM2017-11-26T23:11:36+5:302017-11-27T00:32:45+5:30
निवडणूक म्हटली की जो तो निवडून येण्यासाठीच उमेदवारी अर्ज भरतो. यात काही कर्तव्यदक्ष असतात, परंतु त्यांनी जर निवडणुकीत मतदान मिळविण्यासाठी लागणारे तंत्र बाळगले नाही तर त्याला घरीच बसावे लागते, पूर्वी हाती बेलभंडार देऊन शपथ घातली की मत पक्के होत असे. आता निवडणुकीमध्ये फरक पडला आहे.
त्र्यंबकेश्वर : निवडणूक म्हटली की जो तो निवडून येण्यासाठीच उमेदवारी अर्ज भरतो. यात काही कर्तव्यदक्ष असतात, परंतु त्यांनी जर निवडणुकीत मतदान मिळविण्यासाठी लागणारे तंत्र बाळगले नाही तर त्याला घरीच बसावे लागते, पूर्वी हाती बेलभंडार देऊन शपथ घातली की मत पक्के होत असे. आता निवडणुकीमध्ये फरक पडला आहे. आता सकाळी येणाºया मेदवारालाही...आणि दुपारनंतर येणाºया उमेदवारालाही हो म्हणावे लागते. त्यातल्या त्यात त्र्यंबकेश्वरची तर बातच निराळी..... त्र्यंबकला पूर्वी पाचच वॉर्ड होते. त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने ही स्पेशल केस नगरपालिका केवळ यात्रेकरुंना सोयी सुविधा देण्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका स्थापन केली गेली आहे. आजही शहराची लोकसंख्या केवळ बारा हजार पाचशे एवढी असून, मतदार संख्या अवघी दहा हजारापर्यंत आहे. पूर्वी लोक भोळे होते. त्यांच्या हाती बेलभंडार देऊन शपथ घातली की मत पक्के होत असे. आता मतदार हुषार झाला आहे. लोकशाहीत मतदार राजा असतो. काही मतदार तर बिलंदर असतात. त्यांना माहीत असते की पालिका प्रशासन कामे करणारच असते. शासकीय योजनांचादेखील लाभ होणारच असतो. नगरसेवक एकदा निवडून गेला की, तो पाच वर्षे आपल्याकडे ढुंकून पहायलादेखील वेळ मिळत नसतो. त्यापेक्षा याला घ्या काढून असा सोयीचा विचार करून मतदार मतदानापूर्वी बेरजेचे राजकारण करूनच मतदान करतात. तर उमेदवारदेखील सत्ता मिळाली की, आपल्याच तोºयात राहतो. प्रभागात काम केलेच तर माझ्यामुळे झाले. त्यासाठी शिलालेख वगैरे लावण्याची घाई होते. मोठेपणा मिरविता येतो. मतदार आपल्या समस्या रेटून सांगू शकत नाही. कारण तोच नगरसेवक म्हणू शकतो, मी कुठे तुमचे मत फुकट घेतले ? अशी शोकांतिका मतदारांची होत असते. आणि मतदाराने नाहीच म्हटले तर उमेदवारांना वाटते, म्हणजे आपल्याला मतदान होणार नाही. म्हणून उमेदवाराच आग्रह करतो, आमच्या समाधानासाठी तरी घ्याच. भेट समजा. नाही म्हणू नका. अशी पद्धत रूढ झाली आहे. पूर्वीच्या निवडणुकीत आणि आताच्या निवडणुकीत हाच फरक आहे. पूर्वी नगरसेवक कामे करीत, म्हणूनच खरे काम करणाºया उमेदवारालाच लोक मतदान करीत. आताच्या जमान्यात प्रतिस्पर्धी उमेदवार वाढले.
स्पर्धा वाढली. निवडणूक यंत्रणा राबविण्यासाठी निवडणूक आयोग कार्यान्वित झाले. कायदे आणखी क्लिष्ट व कठोर करण्यात आले. हिशेब द्यावा लागतो. खर्च मर्यादा आली.
तथापि यातूनही पळवाटा काढून उमेदवाराला निवडून येण्यासाठी जे जे करावे लागते ते सर्व केले जाते. काही ठिकाणी तर साम- दाम-दंड-भेद या नीतीचाही वापर करण्यात येतो.
२०० ते २२० मतांचा वॉर्ड
त्र्यंबक नगरपालिकेची स्थापना सन १८५४ साली अवघी दोन तीन हजार लोकसंख्या असताना तत्कालीन ब्रिटिश सरकारने केली. फ्लोटिंग पॉप्युलेशनवरील संख्या विचारात घेऊन पालिकेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला गावचा पाटीलच कारभार पाहत असे. पाटील (पोलीसपाटील) यांना समरी पॉवर असे. पोलीसपाटलांना दंड करण्याचादेखील अधिकार होता.
कालांतराने लोकशाही पद्धत सुरू झाली. आणि निवडणुका होऊ लागल्या. २०० ते २२० मतांचा वॉर्ड असे. पूर्वीपासून ते साधारणपणे १९९० पर्यंत पक्षीय मतदान पद्धत नव्हती. व्यक्ती म्हणून मतदान होत असे.