यशाची प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका : स्वरुपानंद सरस्वती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 03:02 PM2020-01-14T15:02:46+5:302020-01-14T15:05:12+5:30
मिळालेल्या यशानंतरही पुढेही यश मिळविण्यासाठी आकाश मोकळे आहे. म्हणून एका यशाने हुरळून जाऊ नका आणि यश मिळविल्यानंतरही थांबू नका,
नाशिक: यश मिळविण्यासाठी मनूष्य आयुष्यभर धडपड करत असतो. मात्र एकदा यश संपादन झाले की त्याची गोडी वेगळीच असते. तसेच मिळालेल्या यशानंतरही पुढेही यश मिळविण्यासाठी आकाश मोकळे आहे. म्हणून एका यशाने हुरळून जाऊ नका आणि यश मिळविल्यानंतरही थांबू नका, असे पुणे येथील श्रुतिसागर आश्रमाचे प्रमुख स्वामी स्वरु पानंद सरस्वती यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
एचपीटी कला व आरवायके विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सभारंभाचा कार्यक्रम मंगळवारी (दि.१४) उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जीवनात असामान्य यश मिळविण्यासाठी असामान्य ध्येय असले पाहिजे. शिक्षक मार्गदर्शन, प्रेरणा आणि स्फूर्ती देतात, पण विद्यार्थ्यांना स्वत:लाच घडवायचे आहे. आपण पुढे जात असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे, असेही स्वामींनी सांगितले. अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा महासंचालक डॉ. मो.स. गोसावी होते. वर्षभरात विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी बजावलेल्या कामगिरीचा आढावा प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषणात दिला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे यांनी करु न दिला. सूत्रसंचालन डॉ. यु. जी. बारस्कर, प्रा. बी. यू. पाटील आणि डॉ. जे. एम. नंदागवळी यांनी केले. तर आभारप्रदर्शन उपप्राचार्या डॉ. वृन्दा भार्गवे यांनी केले.
यांचा झाला गौरव
सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सागर पाटील व अमोल सोनवणे तर सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून क्षमा देशपांडे आणि महिमा ठोंबरे यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून ज्ञानेश्वरी देवरे आणि सागर रवींद्र पाटील यांना गौरविण्यात आले. तर आदर्श शिक्षकेतर कर्मचारी म्हणून ए. जी. गायधनी , पी. सी. कांबळे , एस. एस. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.