भविष्याची चिंता नको, वर्तमानात जगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:17 AM2017-09-03T01:17:12+5:302017-09-03T01:17:24+5:30
भूतकाळात काय झाले व भविष्यात काय होणार आहे, याची चिंता न करता वर्तमानकाळात आनंददायी जगायला शिका, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी शनिवारी (दि.२) नाशिककरांना दिला. ताणतणाव दूर करण्यासाठी भावनांना मोकळी वाट करून द्या. वर्तमानकाळात जगा, भविष्याची चिंता करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ‘गुरुदक्षिणा’ सभागृहाचे भूमिपूजन करताना डॉ. जगदीश हिरेमठ. समवेत डॉ. राम कुलकर्णी, डॉ. अरुण निगवेकर, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. मो. स. गोसावी आदी.
नाशिक : भूतकाळात काय झाले व भविष्यात काय होणार आहे, याची चिंता न करता वर्तमानकाळात आनंददायी जगायला शिका, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी शनिवारी (दि.२) नाशिककरांना दिला. ताणतणाव दूर करण्यासाठी भावनांना मोकळी वाट करून द्या. वर्तमानकाळात जगा, भविष्याची चिंता करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक दिनानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्यात बोलताना डॉ. जगदीश हिरेमठ यांनी हृदयाच्या आरोग्याचा मंत्र उपस्थिताना दिला. डॉ. हिरेमठ यांनी यावेळी ध्यानधारणेचे फायदे सांगतानाच सहजसोप्या शैलीत ध्वनिचित्रफितीद्वारे हृदयाच्या आरोग्याचे महत्त्व स्पष्ट केले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण निगवेकर, महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसवी, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेतील पी.एचडी. प्राप्त प्राध्यापकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच आदर्श शिक्षक व कर्मचारी पुरस्कारांचेही वितरण यावेळी करण्यात आले. यात प्राचार्या डॉ. ज्योती ठाकूर, डॉ. शेखर जोशी, ग्रंथपाल अनुपमा परांजपे, प्रा. पी. एन. चौबे, मुख्याध्यापक एस. डी. डोंगरे यांना यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर डॉ. कविता पाटील यांना उत्कृष्ट शिक्षक उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गिरीश नातू, के. पी. कुलकर्णी यांना आदर्श कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर डॉ. एम. एस. गोसावी फार्मसी कॉलेजला आदर्श संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बी.वाय.के. महाविद्यालयाच्या ‘व्यवहार’ वार्षिक अंकाला उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार देण्यात आला. तसेच प्रमुख अतिथी डॉ. जगदीश हिरेमठ यांना संस्थेतर्फे फेलोशिप प्रदान करण्यात आली.