धार्मिक कार्यक्रमांनी कोरोना पसरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:16 AM2021-09-27T04:16:22+5:302021-09-27T04:16:22+5:30

बंदीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, शाळा आणि ...

Do religious events spread the corona? | धार्मिक कार्यक्रमांनी कोरोना पसरतो का?

धार्मिक कार्यक्रमांनी कोरोना पसरतो का?

Next

बंदीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, शाळा आणि मंदिरे बंद असल्याने ते कधी उघडणार याबाबत राज्य शासनाला विचारणा केली जात होती. त्यासाठी अनेकदा आंदोलनेदेखील झाली. त्यामुळे राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी शाळा आणि मंदिरे खुली करण्याची घोषणा करीत तारीख जाहीर केली. त्यानुसार ७ ऑक्टोबरपासून मंदिरे खुली होणार आहे. मात्र, मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध कायम असल्याने रोष व्यक्त केला जात आहे.

--------

मंदिरे खुली होणे गरजेचेच आहे. मात्र, मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, संत्सग, पूजा यावर निर्बंध असून, ते चुकीचे आहे. भजन, कीर्तन ही कोरोनाविषयी जनजागृती करण्याची, भीती दूर करण्याची, आंतरिक समाधान मिळवून देण्याची माध्यमे आहेत. सरकारी दौरे, प्रचार, निवडणूक सुरू असताना केवळ धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध हे पटणारे नाही.

- ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बोगीर

--------

प्रार्थना स्थळे सुरू करणे ही लोकभावना आहे. त्यामुळे सरकारने त्याचा आदर करायला हवा. मंदिरे खुली करून तेथील धार्मिक कार्यक्रमांवर बंधने घालणे अयोग्य आहे. सरकारने ऊठसूट भाविकांच्या मागे लागणे चुकीचे आहे. प्रत्येक भाविकाला आपल्या आरोग्याची काळजी असते, त्यामुळे अशा प्रकारच्या बंधनांची गरज नाही.

- सतीश शुक्ल, पुरोहित संघ नाशिक.

-------

मंदिरे सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु, धार्मिक कार्यक्रम कीर्तन, प्रवचन यावर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय योग्य वाटत नाही. या कार्यक्रमामुळे समाजावर संस्कार होतात. आजाराच्या काळात लोकांचे मानसिक संतुलन स्थिर राहण्यास मदत होते. त्यामुळे काही निर्बंध शिथिल करून धार्मिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी.

- ह.भ.प. निवृत्ती कापसे

---------

मंदिरे खुली होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बऱ्याच दिवसांनी मंदिरे खुली होणार असल्याने मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता इतर धार्मिक कार्यक्रमांवर सरकारने बंदी कायम ठेवली असावी.

- ॲड. अजय निकम

विश्वस्त काळाराम संस्थान

-------

मंदिरे सुरू करण्याचा निर्णय आनंददायी आहे. सरकारच्या निर्णयाप्रमाणे ७ ऑक्टोबरपासून मंदिरे खुली होणार असली तरी काही निर्बंध कायम आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी गर्दी टाळून सरकार घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल.

- ॲड. अविनाश गाडे,

पुजारी कपालेश्वर मंदिर

----------- प्रतिक्रिया फोटो : आर ला आहेत -------

Web Title: Do religious events spread the corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.