अकरावी विज्ञान प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागाकडे ओढा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:28+5:302021-07-18T04:11:28+5:30
नाशिक : दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर नव्या मूल्यमापन पद्धतीद्वारे दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी व ...
नाशिक : दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर नव्या मूल्यमापन पद्धतीद्वारे दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांकडून अकरावी प्रवेशाच्या विविध पर्यायांची चाचपणी सुरू झाली आहे; परंतु यावर्षी अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमुळे शहरातील चांगल्या महविद्यालयात प्रवेश मिळणार किंवा नाही, तसेच सीईटी परीक्षेत कसे गुण मिळणार, याविषयी मनात साशंकता असलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांचा अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी ग्रामीण भागाकडे ओढा असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक शहरातील प्रमुख केटीएचएम, आरवायके, बिटको, केव्हीएन नाईक आदी विविध महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेशासाठी गुणवत्ता यादीत अनेक विद्यार्थ्यांना स्थान मिळविता येत नाही. त्याचप्रमाणे शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन थेट मोठ्या क्लासमध्ये शिकवणी घेण्यासाठी वेळेची सांगडही घालता येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी थेट ग्रामीण भागातील महाविद्यालयांचा पर्याय निवडून शहरांमधील नामांकित कोचिंग क्लासच्या माध्यमातून जेईई, नीट, आयआयटी एन्ट्रन्स सीईटीसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागात अकरावी प्रवेश घेण्याकडे अधिक कल दिसून येत आहे. शिवाय कोरोना संकटामुळेही अनेक विद्यार्थी शहरापेक्षा ग्रामीण भागात अकरावीचा प्रवेश घेण्यास प्राधान्य देत आहेत.
----
म्हणून घेतला गावात प्रवेश
ग्रामीण भागात विज्ञान शाखेला सहज प्रवेश मिळतो. शहरात प्रवेश मिळविण्यासाठी सीईटी देऊनही प्रवेश मिळेल की नाही याविषयी साशंकता असते. त्यामुळे थेट ग्रामीण भागात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- विलास जाधव, विद्यार्थी
--
कोरोनाकाळात गावाकडून शहरात जाण्यात धोका असल्याचे कुटुंबियांचे मत आहे. त्यामुळेे गावाजळच्याच कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीचा प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनामुळे पुढील काळात लॉकडाऊन झाले तरी मेस, होस्टेल, यासाठी होणारा खर्च वाया जाणार नाही.
- सचिन कोकणे, विद्यार्थी
अकरावी व तत्सम प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांना आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे. नाशिक शहरात अकरावीच्या प्रवेशासाठी २५ हजार २७० जागा उपलब्ध असून, या जागांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अकरावी प्रवेशासाठी सीईटीआधारे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अभ्यासालाही सुरुवात केली आहे.
अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जूनअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले, तसेच अकरावी प्रवेशाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेत प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये आता एक सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. त्यानुसार शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असून, कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखा यांच्या मिळून २५ हजार २७० हजार जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीसाठी सीईटी परीक्षा होऊन जुलै व ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
अकरावीची सीईटी परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. प्रवेशप्रक्रियेत सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी म्हणून सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे राहील. १०० गुणांच्या परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येणार आहे. सीईटी परीक्षा विद्यार्थ्यांना ऐच्छिक असेल. मात्र, प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर इतर विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करताना या अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे.
इन्फो -
शहरात विज्ञान शाखेच्या सर्वाधिक जागा
शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये - ६०
एकूण जागा - २५२७०
गरतवर्षी प्रवेशासाठी नोंदणी - ३२,१३३
किती जणांनी प्रवेश घेतला - १९,७१२
किती जागा रिक्त राहिल्या - ५,५५८
इन्फो-
अकरावीसाठी गावात प्रवेश का?
अकरावीत प्रवेश घेऊन थेट क्लासेसला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थितीविषयी अडचण निर्माण होत असल्याने काही खासगी क्लासेस चालकांनी शहर परिसरातील गावांमध्ये स्वयंअर्थसाहाय्य कनिष्ठ महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे अशा क्लासेसचे विद्यार्थी थेट अशा गावांतील महाविद्यालयांमध्येच प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे.
ऑफलाइन प्रवेश व्हावेत
- अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रतीक्षा करतात. त्यामुळे माध्यमिक विद्यालयांशी संलग्न आणि प्रकाशझोतात नसलेल्या महाविद्यालयांना विद्यार्थी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागते, त्यामुळे अशा महाविद्यालयांकडून ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याची मागणी होत आहे.
- ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी दीर्घ कालावधी लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष सुरू होण्यासाठी ऑगस्ट, सप्टेंबर उजाडतो, तरी अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असतात. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तसे महाविद्यालयांना व्यवस्थापकीय कोट्यातून प्रवेश करता येत नाही. त्यामुळे ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याची मागणी अशा महाविद्यालयांकडून होते.