राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती तत्काळ करा !
By धनंजय रिसोडकर | Published: September 8, 2023 07:26 PM2023-09-08T19:26:18+5:302023-09-08T19:26:43+5:30
अनेक ठिकाणी उड्डाणपुलावरील पाईप खराब झाल्यामुळे पाणी रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहन चालकांच्या अंगावर पडते.
नाशिक : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारपासून (दि. ०८) सुरू झालेल्या दमदार पावसामुळे नाशिक शहराच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे. करोडो रुपये खर्च करुन उभारलेल्या रस्त्यासह उड्डाणपुलाच्या दुरावस्थेची कारणे काय ? असा जाब विचारत तत्काळ देखभाल दुरुस्ती करण्याचे निर्देश आमदार देवयानी फरांदे यांनी दिले.
अनेक ठिकाणी उड्डाणपुलावरील पाईप खराब झाल्यामुळे पाणी रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहन चालकांच्या अंगावर पडते. इंदिरानगर अंडरपासच्या येथे पावसाच्या पाण्यामुळे तळे निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या देखभालीसाठी करोडो रुपये खर्च केले जात असताना रस्त्याची अशी दुरावस्था का झाली, असा प्रश्न आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला. पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली नव्हती का ? असा प्रश्न विचारताना मेंटेन्स केलेला असताना रस्त्याची दुरावस्था कशी होते ? असा प्रश्नही त्यांनी प्रकल्प संचालक यांना विचारला.
मुंबईत नाशिकच्या पेक्षा जास्त पाऊस असताना नाशिकच्या रस्त्याची दुरावस्था होण्याची कारणे शोधून काढण्यासाठी चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. उड्डाणपुलाचे सर्व पाईप बदलून मोठ्या व्यासाचे पाईप टाकण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. याबाबत ८ दिवसात कार्यवाही करून सुधारणा करण्याची मागणी करतानाच महामार्गाच्या दुरावस्थाबाबत लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रकल्प संचालक यांना दिले. तसेच याबाबत ८ दिवसात कार्यवाही न झाल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारादेखील दिला आहे.