पॉलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:19 AM2021-09-17T04:19:25+5:302021-09-17T04:19:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : पॉलिटेक्निकसाठी ऑनलाईन पर्याय नोंदविण्याची अंतिम मुदत गुरुवारी (दि. १६) संपली असून, विद्यार्थ्यांचा ओढा ...

Do you get a job after polytechnic, brother? | पॉलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ?

पॉलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : पॉलिटेक्निकसाठी ऑनलाईन पर्याय नोंदविण्याची अंतिम मुदत गुरुवारी (दि. १६) संपली असून, विद्यार्थ्यांचा ओढा आता रोजगाराभिमुख शिक्षणाकडे वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळेच अनेक विद्यार्थी संगणक आणि इलेक्ट्रिक विद्याशाखेलाच प्रवेश घेण्यास उत्सुक आहेत. कोरोनाच्या प्रभावामुळे मागील दोन वर्षांपासून पॉलिटेक्निकसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद काही प्रमाणात घटला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली, तरी यावर्षीही अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यात १ शासकीय व २४ खासगी अशी एकूण २५ पॉलिटेक्निक महाविद्यालये असून, जिल्ह्यातील ९,०९० जागांसाठी केवळ ७ हजार १९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यावरून पॉलिटेक्निक प्रवेशांनाही अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अकरावी प्रवेशाच्या तीन फेऱ्या उलटूनही विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत असतानाच आयटीआयसारख्या औद्यागिक कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येही प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही घट झाली आहे. त्यामुळे दहावीनंतर शैक्षणिक प्रवाहातून विद्यार्थ्यांची गळती वाढल्याची साशंकता शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होऊ लागली आहे. कोरोनाकाळात अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्यामुळे दहावीनंतरच्या शिक्षणासाठी येणारा खर्च आणि कुटुंबाच्या उत्पन्नात योगदान देण्याची जबाबदारी यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाच्या प्रवाहातून गळती होत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

एकूण पॉलिटेक्निक महाविद्यालये - २५

एकूण प्रवेश क्षमता - ९०९०

प्राप्त प्रवेश अर्ज - ७१९०

शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालये - १

शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालय प्रवेश क्षमता - ८१०

खासगी महाविद्यालये - २४

खासगी पॉलिटेक्निक महाविद्यालय प्रवेश क्षमता - ९२८०

--

संगणक, इलेक्ट्रिककडे ओढा

पॉलिटेक्निक प्रवाशासाठी अर्ज करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचा कल संगणक किंवा इलेक्ट्रिक विद्याशाखेकडे वाढला आहे. पूर्वी अतिमहत्त्वाचा वाटणाऱ्या मॅकेनिक (यांत्रिक) विद्याशाखेपेक्षा सिव्हील (स्थापत्य) अभियांत्रिकीचे विद्यार्थ्यांना अजूनही आकर्षण वाटत असले, तरी भविष्याचा वेध घेत विद्यार्थ्यांचा संगणक, इलेक्ट्रिककडे ओढा वाढला आहे.

---

म्हणून पॉलिटेक्निकला पसंती

पॉलिटेक्निकनंतर नोकरी, व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. शिवाय तंत्रशिक्षणात पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रमही पूर्ण करून मिळालेल्या नोकरीत अथवा सुरू केलेल्या व्यावसायात प्रगती साधता येते. त्यामुळे पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

- राहुल कदम, विद्यार्थी

---

अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी पॉलिटेक्निक शिक्षणानंतर संधी उपलब्ध असून, पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम व परीक्षा देणे सोपे होते. थोडक्यात पॉलिटेक्निकमुळे तंत्रशिक्षणाचा पाया भक्कम होत असल्यानेच प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

- भूषण गायकर, विद्यार्थी

---

मागील वर्षापेक्षा चांगला प्रतिसाद

पॉलिटेक्निक अभ्यासक्रम प्रवेशावर कोरोनाचा परिणाम झाल्याचे दिसून येत असले, तरी मागील वर्षापेक्षा यावर्षी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया पॉलिटेक्निक महाविद्यालयांचे प्राचार्य व तंत्रशिक्षण तज्ज्ञांमधून उमटत आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमानंतर नोकरी, व्यवसायाच्या संधी उपलब्ध असून, तंत्रशिक्षणात पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे पर्यायही उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षण पदविका अर्थात पॉलिटेक्निक प्रवेशाकडे कल वाढत असल्याचे मत प्राचार्यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Do you get a job after polytechnic, brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.