दलितवस्ती, बंधारे पैसे खाण्यासाठी आहेत काय?
By admin | Published: December 24, 2015 12:07 AM2015-12-24T00:07:21+5:302015-12-24T00:09:48+5:30
आढावा बैठक : आयुक्तांनी अधिकाऱ्यांना खडसावले
नाशिक : बांधकाम विभागाने केलेल्या रस्त्यांची कामे टिकतात आणि दलितवस्ती सुधार योजनेतून केलेल्या रस्त्यांमधून धूळ उडते. इतकेच नव्हे तर छोटे-छोटे बंधारे बांधण्यामागचा उद्देश काय? केवळ पैसे खाण्यासाठीच हे उद्योग केले जातात काय? यापुढे असे चालणार नाही, या शब्दात बुधवारी (दि. २३) विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्हा परिषदेच्या अभियंते व उपअभियंत्यांना खडसावले.
बुधवारी जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीलाच ग्रामपंचायत विभागांतर्गत कार्यरत असलेले संग्राम कक्षातील कर्मचारी संपावर असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाल्यामुळे आयुक्त एकनाथ डवले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ठणकावत सांगितले की, कोणावरही विसंबून न राहता या कर्मचाऱ्यांना पर्यायी यंत्रणा तयार करण्यासाठी आपण वारंवार सांगितले आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण का दिले नाही,अशी विचारणा केली. येवला तालुक्यातील सर्वच योजना व विकासकामांबाबत प्रचंड तक्रारी असल्याने त्यांनी येवला गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे कळते. तसेच लघुपाटबंधारे विभागाच्या अभियंता व उपअभियंत्याची कान उघडणी करीत जलयुक्तची कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा, केवळ छोटे-छोटे बंधारे करून पैसे खाण्याचे धंदे बंद करा, या शब्दात कान उघडणी केल्याचे समजते. दलितवस्तीचे रस्ते का निकृष्ट होतात, बाकी विभागांचे रस्ते चांगले आणि दलितवस्तीचे रस्ते धुळीने भरलेले, हेसुद्धा बंद झाले पाहिजे,अशी तंबी त्यांनी यावेळी दिल्याचे कळते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, रणधीर सोमवंशी, प्रतिभा संगमनेरे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, आर. एस. परदेशी आदिंसह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)