नाशिक चे तत्कालीन जिल्हाधिकारी जॅक्सनविषयी आपणांस या गोष्टी माहीत आहे का?
By Azhar.sheikh | Published: December 21, 2017 03:49 PM2017-12-21T15:49:54+5:302017-12-21T16:01:35+5:30
इंग्रज राजवटीमध्ये भारतीय शासकिय सेवेत अधिकारी पदावर असलेले आॅर्थर मेसन टिप्पेट्स जॅक्सन हे १९०९ सालापर्यंत नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावर होते. १९१० सालापासून ते मुंबईच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारणार होते. हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या ‘विजयानंद’ सिनेमागृहात गोळ्या घालून हत्त्या केली होती.
अझहर शेख : नाशिक : इंग्रज राजवटीमध्ये भारतीय शासकीय सेवेत अधिकारी पदावर असलेले आॅर्थर मेसन टिप्पेट्स जॅक्सन हे १९०९ सालापर्यंत नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावर होते. १९१० सालापासून ते मुंबईच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार होते. २१ डिसेंबर १९०९ साली जॅक्सन यांची मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले १८ वर्षीय हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या ‘विजयानंद’ सिनेमागृहात गोळ्या घालून हत्त्या केली होती.
जॅक्सन यांच्या हत्त्येमागे काय होते कारण?
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्याविरुद्धचा खटला आणि अटकेबाबत जॅक्सन यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. बाबाराव यांच्यावर राष्टÑविरोधी घोषणाबाजीचा खटला त्यावेळी भरण्यात आला होता. याचा बदला म्हणून जॅक्सन यांची कान्हेरे यांनी हत्त्या केली. जॅक्सनच्या हत्त्येचा कट शिजविला गेला होता आणि १९१० या वर्षाच्या पहिल्या महिन्यात हत्त्या करण्याचा निर्णय झाला होता.
कोठे आहे ते ‘विजयानंद’ :
‘विजयानंद’ हे सिंगल पडदा सिनेमागृह आहे. या सिनेमागृहाला मोठा इतिहास लाभलेला असून, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी या सिनेमागृहाचा वापर केला आहे. हे सिनेमागृह मूळ नाशिक अर्थात जुने नाशिकमधील भद्रकाली परिसरात आहे. आजही या सिनेमागृहात चित्रपटांचे शो होतात. चित्रपटसृष्टीचा जन्म आणि इंग्रज राजवटीमधील जॅक्सन हत्येचा साक्षीदार विजयानंद सिनेमागृह आहे.
जॅक्सन यांची कबर नाशिकमध्येच !
जॅक्सन यांचा वध १९०९ साली झाला. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे दफन नाशिकच्या सारडा सर्कल परिसरातील ख्रिस्ती कब्रस्तानात करण्यात आले. त्यांची कबर आजही या कब्रस्तानात पहावयास मिळते. सदर कबरीवर जॅक्सन यांचे पूर्ण नाव, जन्म व मृत्यूचा दिनांक व जिल्हाधिकारी नाशिक, अशी माहिती इंग्रजीमधून लिहिण्यात आली आहे. सदर कब्रस्तानदेखील बिटिश राजवटीचे साक्षीदार आहे.