डॉक्टर देता का कोणी डॉक्टर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:53 PM2018-10-29T23:53:57+5:302018-10-29T23:55:10+5:30

ऐन रोगराईचा काळ आणि महापालिका रुग्णालयांच्या दुरवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण झाली आहे. महापालिकेने यापूर्वी २८ डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात काढली

 Doctor Doctor? | डॉक्टर देता का कोणी डॉक्टर?

डॉक्टर देता का कोणी डॉक्टर?

Next

नाशिक : ऐन रोगराईचा काळ आणि महापालिका रुग्णालयांच्या दुरवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण झाली आहे. महापालिकेने यापूर्वी २८ डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात काढली, मुलाखती घेतल्या, परंतु जेमतेम आठच डॉक्टर रुजू झाल्याने पुन्हा भरतीसाठी प्रक्रिया राबविण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे.  सामान्यत: ग्रामीण भागात वैद्यकीय व्यावसायिक पुरेशा प्रमाणात नसतात. वैद्यकीय शाखेचे पदवी शिक्षण घेतानाच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये काम करण्याचे बंधपत्र घेण्याचा शासकीय नियम आहे. परंतु बंधपत्राच्या नियमानुसार प्रशिक्षणार्थी डॉक्टर रक्कम भरण्यास तयार होतात, मात्र ग्रामीण भागात जात नाही. परंतु आता नाशिक शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांविषयीदेखील अशीच अवस्था झाली आहे. महापालिकेने मानधन किंवा करारपद्धतीने डॉक्टरांची भरती करण्याची तयारी दर्शवूनदेखील प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.  गेल्या महिन्यात महापालिकेने डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यासाठी २८ जागांसाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार इच्छुकांनी अर्जदेखील केले, परंतु निवड झालेल्यांपैकी अवघे ८ डॉक्टरच रुजू झाले. निवड होऊनही उर्वरित डॉक्टर रुजू झाले नाहीत. त्यामुळे आता महापालिकेने पुन्हा एकदा भरतीसाठी जाहिरात काढली आहे. सध्या स्वाइन फ्लू, डेंग्यूच्या साथीचा कहर सुरू आहे. स्वाइन फ्लूमुळे ६०च्या घरात मृत्यू पावलेल्यांची संख्या आहे तर डेंग्यूमुळे दोन जण दगावले आहेत. दोन हजार संशयित डेंग्यू रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी साडेसहाशे जणांना डेंग्यू झाला आहे. अशा स्थितीत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अवस्था बिकट झाली आहे. पुरेसे डॉक्टर नाहीत. जे आॅनकॉल आहेत ते वेळेवर येत नाहीत. अशा स्थितीत महापालिकेतील लोकप्रतिनिधीच रुग्णालयांची दुरवस्था चव्हाट्यावर आणत आहेत. परंतु त्यात सुधारणा करण्यासाठी जाहिराती देऊनही डॉक्टर येण्यास तयार नसल्याने अडचण होत आहे.
रुग्णालय कसे चालविणार?
महापालिकेच्या वतीने पंधरा ठिकाणी बंद पडलेले शहरी आरोग्य केंद्र सुरू करण्याचे आवाहन आहे शिवाय सातपूर येथे नवीन रुग्णालयदेखील बांधण्याचे नियोजन आहे. अशास्थितीत सध्याच्याच रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध होत नसताना नव्याने कोठून आणणार, असा प्रश्न आता केला जात आहे.
महापालिकेने यापूर्वी २८ डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात काढली, मुलाखती घेतल्या, परंतु जेमतेम आठच डॉक्टर रुजू झाल्याने पुन्हा भरतीसाठी प्रक्रिया राबविण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे.
महापालिकेने डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यासाठी २८ जागांसाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार इच्छुकांनी अर्जदेखील केले, परंतु निवड झालेल्यांपैकी अवघे ८ डॉक्टरच रुजू झाले.
डॉक्टरांची टाळाटाळ
महापालिकेतील राजकारण, प्रशासनाकडून असणारा अति दबाव तसेच प्रस्थापित डॉक्टरांमधील वर्चस्ववादाची स्पर्धा अशा अनेक कारणांमुळे महापालिकेच्या सेवेत येण्यास डॉक्टर तयार नसल्याचे सांगितले जात आहे.

Web Title:  Doctor Doctor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.