धक्कादायक! डॉक्टर गायब, कंपाउंडरच देतात गोळ्या; 'या' ठिकाणी महापालिकेचा गलथान कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:24 PM2022-04-19T12:24:09+5:302022-04-19T12:28:29+5:30
इंदिरानगर - महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे वडाळा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून डॉक्टर गायब असून, त्यामुळे दररोज ...
इंदिरानगर - महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे वडाळा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून डॉक्टर गायब असून, त्यामुळे दररोज तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना तपासणीअभावीच माघारी फिरावे लागत आहे.
वडाळा गावात मेहबूबनगर, सादिकनगर, गुलशननगर, मुमताज नगर, अण्णा भाऊ साठे नगरसह परिसरात सुमारे ६० टक्के हातावर काम करणाऱ्या नागरिकांची वस्ती आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने सुमारे दीड वर्ष पूर्वी घरकुल योजनेलगत वीस खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले. मात्र त्यात फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी डॉक्टर तपासून औषधे, गोळ्या देतात. मात्र गंभीर रुग्णांना औषध उपचारासाठी दाखल करण्याची सोय अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील रुग्ण सकाळी डॉक्टरांकडून तपासून औषध गोळ्या घेण्यासाठी दररोज येतात. परंतु गेल्या आठ दिवसांपूर्वी डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असताना त्यांचा अपघात झाला. त्यामुळे त्यांना औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेव्हापासून वडाळा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने तेथे येणाऱ्या रुग्णांना भारतनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येते. त्यासाठी रुग्णांना सुमारे तीन किमी अंतर पायपीट करत गाठावे लागत आहे, तर काही रुग्ण डॉक्टर नसल्याचे पाहून माघारी फिरत आहेत. या संदर्भात महापालिकेला कल्पना असूनही पर्यायी डॉक्टरांची नेमणूक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, प्रस्तृत प्रतिनिधीने सोमवारी (दि. १८) सकाळी साडेदहा वाजता वडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असता, डॉक्टर नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली तर काही रुग्णांना कंपाउंडरकडूनच तपासणी करून रुग्णांना औषध, गोळ्या देण्यात येत असल्याचे दिसून आले.