वयाच्या चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:18 AM2021-08-19T04:18:58+5:302021-08-19T04:18:58+5:30
पंचवटी : प्रादेशिक परिवहन कार्यालयात लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्या अर्जदारांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शासनाने आता घरबसल्या वाहनाचे लायसन्स काढण्याची सुविधा ...
पंचवटी : प्रादेशिक परिवहन कार्यालयात लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्या अर्जदारांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शासनाने आता घरबसल्या वाहनाचे लायसन्स काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, वयाच्या चाळिशीनंतर वाहन परवाना नूतनीकरण करायचा असल्यास आता शासनाने फेसलेस सुविधा सुरू केली असून त्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.
वयाच्या चाळिशीनंतर तसेच एखाद्याला वयाच्या विसाव्या वर्षानंतर व्यावसायिक परवाना काढायचा असेल, तर त्यासाठी देखील एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. त्यानुसार नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात देखील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार सिस्टिम आता ॲक्टिव्हेट पोर्टल अपलोड झाली आहे. मात्र अद्यापपर्यंत अर्ज आले नसल्याने एकही लायसन्स देण्यात आलेले नाही, असे आरटीओच्या सूत्रांनी सांगितले.
चाळिशीनंतर दुचाकी तसेच चारचाकी लर्निंग लायसन्ससाठी तसेच चाळिशीच्या आत व्यावसायिक परवाना असेल तर, त्या उमेदवारांना डॉक्टरांचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. मात्र चाळिशीच्या आत दुचाकी, चारचाकी लर्निंग लायसन्ससाठी येणाऱ्या उमेदवारांना एमबीबीएस डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
इन्फो...
किती वयापर्यंत मिळते लायसन्स
- वयाच्या कितव्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाते, याबाबत कोणतेही नियम नाहीत.
- वयाच्या अठरा वर्षाच्या आत विदाऊट गिअर म्हणजेच मोपेडचे लायसन मिळू शकते
- वयाच्या चाळिशीनंतर लायसन्स काढण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी संबंधित डॉक्टरांना ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.
इन्फो...
लर्निंग लायसन्स ऑनलाईन
- कोरोनानाधी प्रत्यक्ष आरटीओमध्ये जाऊन लर्निंगच लायसन्स काढावे लागत असे.
- आता काेराेनामुळे घरबसल्या लायसन्स काढता येते. ऑनलाईन अर्ज अपलोड केल्यानंतर त्याची तपासणीदेखील ऑनलाईन होते.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर परीक्षा घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने देता येते किंवा प्रत्यक्ष आरटीओमध्ये जाऊनदेखील परीक्षा देण्याची सोय आहे.
इन्फो..
एका डॉक्टरला दिवसाला वीस प्रमाणपत्रे देता येणार
१ प्रमाणपत्र डॉक्टरांना स्वतः आरटीओ पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. डॉक्टरांकडे प्रमाणपत्र घेण्यासाठी गेलेल्या उमेदवारांची वन ए मेडिकल प्रमाणपत्रानुसार माहिती घेऊन प्रमाणपत्र दिले जाते.
२ लायसन्ससाठी डॉक्टरांकडून रातांधळेपणा, बहिरेपणा, मिरगी दौरा, डोळे, तसेच अन्य आजारांची तपासणी केली जाते.
३ साधारणपणे डॉक्टरांना रुग्ण तपासणीस १५ ते वीस मिनिटे कालावधी लागतो. तपासणीनंतर प्रमाणपत्र पोर्टलवर अपलोड करावे लागणार असल्याने एक डॉक्टरला दिवसभरात किमान वीस वैद्यकीय प्रमाणपत्रे देता येतील.
कोट.
शासनाने फेसलेस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे डॉक्टरांना आता ऑनलाईन पद्धतीने वैद्यकीय प्रमाणपत्र दयायचे आहे. तसेच डॉक्टरांना स्वतः आरटीओ पोर्टलवर वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करायचे असल्याने त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाईल. संबंधित डॉक्टरांनी वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतरच चाळिशीनंतर लर्निंग लायसन्स काढण्याची व नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
- विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी