डॉक्टरांनी समाजातील वंचितांपर्यंत पोहचावे
By admin | Published: May 22, 2015 10:44 PM2015-05-22T22:44:32+5:302015-05-22T22:48:28+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पदवीप्रदान सोहळ्यात प्रतिपादन
नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले असले तरी त्यांचे समाजशिक्षण ही निरंतर प्रक्रिया सुरूच राहणार आहे. ज्या समाजाने आपणाला शिक्षणाची संधी दिली त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो; त्यांचे ऋण फेडण्याचे कर्तव्य डॉक्टरांनी पार पाडले पाहिजे. पदवी घेताना ज्या मूल्यांची आपण शपथ घेतली त्याचे पालन पुढील आयुष्यात करण्यासाठी समाजातील वंचित घटकांपर्यंत डॉक्टरांनी पोहचले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. विद्यापीठाच्या शिक्षक प्रबोधिनी सभागृहात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा प्र-कुलपती विनोद तावडे, वित्तमंत्री सुधीर मुनंगट्टीवार, पालकमंत्री गिरीश महाजन, प्र-कुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर, कुलसचिव काशीनाथ गरकळ तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रुग्णांची आणि देशाची सेवा करण्याची शपथ घेतली आहे. या शपथेचे पालन केले गेले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे किंबहूना त्यांची ही जबाबदारीच आहे. आपला देश हा तरुणांचा देश आहे. या तरुणांच्या भरवशावर भारत उद्याची महासत्ता होऊ शकते. त्यामुळे तरुणांकडून देशाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. देशाचे सरासरी वय २५ वर्ष असल्याने देशाला फार मोठी संधी आहे. ही संधी या तरुणांच्या रूपाने देश पाहत असल्याचेही फडणवीस म्हणाले.
आज देशातील ४० टक्के बालके हे कमी वजनाचे जन्माला येतात, याचाच अर्थ कुपोषण घालविण्यासाठी चांगल्या आरोग्य सुविधेची आणि संशोधनाचीही गरज आहे. विद्यापीठांचे कामच मुळी संशोधनाला चालना देणे असे आहे. त्यामुळे विद्यापीठाचे नातेदेखील समाजाशी एकरूप असेच असले पाहिजे. हे परस्पर पुरक संबंध असावेत. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्याचेदेखील मोठे आव्हान या डॉक्टांपुढे आहे. या क्षेत्रात आणखी काय करता येऊ शकते, ग्रामीण भागात सक्षम वैद्यकीय यंत्रणा कशी उभारता येईल याचाही विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. समाजातील गोरगरीब घटक, वंचित समाजासाठी आपण आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
याप्रसंगी वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश महाजन, कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांचेही यावेळी भाषणे झाली. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा करण्याचा सेवाभाव डॉक्टरांनी जपला पाहिजे. अनेक डॉक्टर्स हे ग्रामीण भागात सेवा करण्याचे टाळतात. काही डॉक्टर्स तर बंधपत्र न घेता ते रद्द करण्यासाठी पैसेदेखील मोजतात, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाच्या कारकिर्दीचा आढावा सादर करताना विद्यापीठाने केलेले काम आणि मिळविलेले सन्मान याविषयी विवेचन केले. विद्यापीठ स्थापनेपासून असलेला मनुष्यबळाचा प्रश्न यावेळी जामकर यांनी उपस्थित केला. कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेकडेदेखील त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले. विद्यापीठच्या परीक्षा विभागासाठी स्वतंत्र परीक्षा भवन असावे, अशी मागणीदेखील जामकर यांनी यावेळी मांडली.
विद्यापीठाने केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकीचा आढावाही त्यांनी सादर केला. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी स्वप्नील तोरणे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.