गोदा-दारणा संगम प्रथमच कोरडाठाक
By Admin | Published: June 17, 2016 12:02 AM2016-06-17T00:02:50+5:302016-06-17T00:16:19+5:30
पहिली वेळ : अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेले घाट पाहण्याची संधी
दत्ता दिघोळे नायगाव
भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने नायगाव शिवारातील गोदावरी व दारणा संगम प्रथमच कोरडाठाक पडला आहे. गोदावरी पात्र कोरडेठाक पडल्याने अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेला घाट पूर्णपणे उघडा पडल्याने तो पाहण्यासाठी परिसरातील नागरिक याठिकाणी गर्दी करत आहेत.
गोदा-दारणा या दोन नद्यांचा संगम दक्षिणमुखी असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. जोगलटेंभी ते नायगाव घाट या ठिकाणी आजपर्यंत एकदाही गंगेचे पात्र कोरडेठाक पडले नसल्याचे वयोवृद्ध सांगतात. मात्र, गेल्यावर्षी अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे पाण्याचे आवर्तन न सोडल्याने या भागातील गंगेचे थेट तळ उघडे पडल्याने या भागातील दृश्य भयानक भासू लागले आहे. नायगाव शिवारात अहल्यादेवी यांनी हेमाडपंती पद्धतीने घाटाची बांधणी केली आहे. जवळपास ५० पायऱ्या असलेल्या या घाटाला चार बुरुज असून, अकरा ठिकाणी छोटे मंदिरासारखे गोलाकार बांधीव बोगदे आहे. घाटाच्या काही भागात नक्षीकाम केल्याचे दिसते. अशा सुंदर घाटाचे पूर्णरूप सध्या नदीपात्रातून बघायला मिळते. तसेच आजपर्यंत याठिकाणाची खोली किती आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. सध्या पूर्ण कोरडीठाक पडलेल्या गंगेच्या तळाला पाहण्याची अनोखी संधी नायगाववासीयांना दुष्काळामुळे मिळाली आहे. संपूर्ण तळ टणक खडकाने व्यापला आहे. सध्या दोन-तीन ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. दिवसेंदिवस ते डबके तळ गाठत असल्याने धार्मिक विधीलाही येथे गंगेचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. शिल्लक पाण्याचा दुर्गंध येत असल्याने धार्मिक विधी करणाऱ्यांची गैरसोय होत आहे.
या ठिकाणच्या पाणीपुरवठा करण्याच्या सर्वच योजना बंद झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. गंगेच्या पात्राबरोबर दोन्ही किनाऱ्यांवर दिसणारे बागायती पिकेही पाण्याअभावी करपल्याने नेहमी
हिरवा दिसणारा परिसर उजाड झाला आहे.