सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक : आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व करंडक स्पर्धा केटीएचएमला फिरता करंडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:59 PM2018-01-16T23:59:47+5:302018-01-17T00:20:05+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्वर्गीय दादापाटील केदार यांच्या स्मरणार्थ येथील महाविद्यालयात या वर्षापासून स्मृती करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग केदार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्र माचा समारोप व बक्षीस वितरण महंत तुळशीराम महाराज गुठ्ठे, हरिष आडके व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रथम पाच हजार रु पये, द्वितीय तीन हजार, तृतीय दोन हजार व उत्तेजनार्थ एक हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब कासार व नीलेश वाक्चौरे यांनी केले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य संदीप भाबड, प्रशांत उगले, राजेंद्र केदार, जगदीश माळी, मारु ती इलग, बाळासाहेब देशमुख, अरुण आव्हाड, सोमनाथ आव्हाड, कल्पना घुगे, सविता भागवत, सविता घुले आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सरपंच लीला सांगळे, उपअभियंता अविनाश लोखंडे, कारभारी आव्हाड, विश्वास खेडेकर उपस्थित होते. दोडी महाविद्यालयात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले जातात, त्यामुळे येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते. तसेच अशा आयोजित स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व अभिव्यक्ती कलेला वाव मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
राज्यभरातून स्पर्धकांचा प्रतिसाद
आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व करंडक स्पर्धेत प्रथम क्र मांक निखिल नगरकर (अहमदनगर) व अशोक चंद्रभान शिंदे (पारनेर) यांनी पटकाविला.द्वितीय क्र मांक विवेक सतीश चित्ते, तृतीय क्र मांक श्वेता भामरे व हर्षल औटे यांनी मिळविला, तर उत्तेजनार्थ ज्ञानेश्वर सानप, सारिका पवार यांनी पटकावले. नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयाने फिरता करंडक घेतला. स्पर्धेत परीक्षक म्हणून राजेंद्र सांगळे, कैलास गोपाळे, शेषराव डमाळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत अहमदनगर, नाशिक, पुणे, धुळे, जळगाव, औरंगाबाद, सातारा, सांगली इत्यादी जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला. दिवसभर सुरू असलेल्या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी तसेच अनेक श्रोते उपस्थित होते. स्पर्धकांच्या वक्तृत्वातून सखोल अभ्यास दिसून येत होता.