कोरोना प्रतिबंधक लस घेता का कोणी लस...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:18 AM2021-09-15T04:18:27+5:302021-09-15T04:18:27+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेत नाशिक शहराला त्याची तीव्रता कळालीच, परंतु पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर होती. त्यातच जानेवारी महिन्यापासून केंद्र ...
कोरोनाच्या पहिल्या लाटेत नाशिक शहराला त्याची तीव्रता कळालीच, परंतु पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर होती. त्यातच जानेवारी महिन्यापासून केंद्र शासनाने कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस उपलब्ध करून दिल्यानंतरही सुरुवातीला या लसींविषयीची असलेली भीती आणि शंका दूर झाली; मात्र त्यानंतर लसीकरणाला एकदम गर्दी उसळली आणि लसीचे डोसही मिळत नसल्याने नाशिकमध्ये गोंधळाचे वातावरण होते. शहरातील माेजक्याच केंद्रात लसीकरण होत असल्याने नाशिकरोडचे सिन्नरफाटा किंवा सिडकोतील अचानक चौक अशा सर्वच ठिकाणी पहाटपासून नागरिक रांगा लावत तसेच नाश्त्याचे डबे देखील घेऊन जावे लागत होते. इतकी भयंकर स्थिती होती. गर्दी टाळण्यासाठी नगरसेवकांच्या मागणीनुसार अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली; मात्र डोस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना तर परत जावे लागत होते, शिवाय डोस नाही तर केंद्र कशाला सुरू केले असा प्रश्न देखील केला जात होता.
दरम्यान, जून, जुलै महिन्यातील हे चित्र ऑगस्टपासून बदलले आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाली आहे. त्यातच सुरुवातीचा गोंधळ कमी होऊन लसीकरणाचे टोकन देऊन सुयोग्य नियोजन झाल्याने नागरिकांना सहज डाेस मिळू लागले आणि लसीकरणाची गतीही वाढली आता लसीकरण वेगाने झाल्याने आणि गर्दी नसल्याने अनेक केंद्रांवरून डोस देखील परत येऊ लागले आहेत. दररोज साधारणत: २० ते २२ हजार नागरिकांना लस दिली जाते. त्यामुळे महापालिका आणि नगरसेवकांना लस घेता का कोणी लस अशी विचारणा करण्याची वेळ आली आहे, महापालिका प्रशासनाने देखील याला दुजाेरा दिला आहे.
कोट...
गेल्या काही दिवसात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे अनेक केंद्रांवरील डोस परत येऊ लागले आहेत. ज्या लसीकरण केंद्रात प्रतिसाद कमी मिळतो, त्याच्या जवळच्या दुसऱ्या भागात लसीकरण केंद्र सुरू केले जाते. साधारणत: १४ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे.
- डॉ. अजिता साळुंखे, लसीकरण विभागप्रमुख, महापालिका
इन्फो..
एकूण उद्दिष्ट १४००००
मिळालेल्या कोविशिल्ड- ९,५४,५२०
कोव्हॅक्सिन- १,५४,३६३
दिलेला पहिला डोस-६,७४,९५४
दुसरा डोस- २,५४,६८०
एकूण लसीकरण- ९२९,६३४