कुणी बेड देतं का बेड....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:12 AM2021-04-26T04:12:55+5:302021-04-26T04:12:55+5:30
नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांना शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी ‘बेड’ मिळविणे अवघड झाले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयापासून तर ...
नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांना शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी ‘बेड’ मिळविणे अवघड झाले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयापासून तर सर्वच मनपाच्या रुग्णालयांपर्यंत कोठेही बेड शिल्लक नसल्यामुळे नातेवाइकांची तारांबळ उडत असून रुग्णांची बेडअभावी हेळसांड होत आहे. मनपाच्या दवाखान्यांमधून जिल्हा रुग्णालय तर जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून मनपा रुग्णालयांचा ‘पत्ता’ सांगितला जातो; मात्र कोठेही बेडचा थांगपत्ता लागत नसल्याने ‘आमच्या रुग्णांना कुणी बेड देतं का बेड...’ असा आर्त सवाल नातेवाइकांकडून उपस्थित केला जात आहे.
--
प्रसंग-१ : स्थळ : झाकीर हुसेन रुग्णालय : वेळ : दु. १२: ४० वा. महिरावणी येथून रिक्षामधून रुग्णाला येथे आणले गेले. नामदेव ओहोळ (४८) असे रुग्णाचे नाव असून त्यांना त्यांचा भाच्याने सर्वप्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. तेथे ऑक्सिजन बेड उपलब्ध नसून वेटिंग खूप आहे, असे सांगण्यात आले. झाकीर हुसेन रुग्णालयातदेखील असेच उत्तर मिळाले, त्यामुळे पदरी निराशा आली. एचआरसीटी स्कोर २४ असलेल्या या रुग्णाला विनाउपचार येथून पुन्हा नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयाच्या दिशेने नेण्यात आले. तेथेही बेड मिळाला असेलच याबाबतची खात्री पटू शकलेली नाही. (१२पीएचएपी६७)
--
प्रसंग-२ : स्थळ : झाकीर हुसेन रुग्णालय : वेळ : दु: १२:५५ वा. दिंडोरी येथून एका ५५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला त्यांचे मित्र भाऊसाहेब हे मारुती ओम्नी वाहनातून घेऊन आले. बेड शिल्लक नाही, ‘ऑक्सिजनचा पाॅईंट नाही, रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन जा’ असा सल्ला देण्यात आला. तेथून रुग्णाला घेऊन वाहन शासकीय रुग्णालयाकडे रवाना झाले; मात्र तेथेही या रुग्णाला बेड मिळाले असेल का? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. (फोटो-२५पीएचएपी७०)
--
प्रसंग-३ : स्थळ : झाकीर हुसेन रुग्णालय : वेळ दु.१:०५वा. त्र्यंबकेश्वर येथून रुग्णवाहिकेतून पुंडलिक महाले यांनी त्यांचे मोठे बंधू पीतांबर महाले (५४) यांना घेऊन जिल्हा रुग्णालयात सर्वप्रथम गेले. तेथे ऑक्सिजन बेड नसल्याने त्यांना माघारी पाठविण्यात आले. सिव्हिलमध्ये ऑक्सिजन नसल्याचे सांगितले गेले. रुग्णवाहिकेचे ऑक्सिजन सिलिंडरवर त्यांचे प्राण टिकून आहे. ते शहरातील सर्व खासगी रुग्णालये फिरुन आले कोठेही त्यांना बेड मिळत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली. झाकीर हुसेन रुग्णालयातसुध्दा बेड नसल्याचे सांगितले गेले. (फोटो-२५पीएचएपी६८)
--
प्रसंग-४ : स्थळ झाकीर हुसेन रुग्णालय : वेळ दु. १:१० वा. कोरोनाबाधित खंडू रामदास भगत (२८,रा मुळेगाव, त्र्यंबकेश्वर) या तरुण रुग्णाची ऑक्सिजन पातळी अत्यंत खालावली असून त्यास व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. पाच दिवसांपासून रुग्णालयात प्रयत्न करत आहे; मात्र कोठेही बेड मिळत नसून नाशिकसह संपूर्ण राज्याची आरोग्यव्यवस्था ढासळून गेली आहे. बेडच्या चौकशीसाठी या रुग्णालयात आम्ही चौकशीसाठी आलो असता येथेही बेड नसल्याचे त्यांची बहीण सविता ढगे यांनी बोलताना सांगितले.
--
प्रसंग-४ : स्थळ : झाकीर हुसेन रुग्णालय : वेळ दु. १:२०वा. कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिक राजाराम यशवंत पगारे (७५,रा.जेलरोड) यांना उपचारार्थ दाखल करण्यासाठी रिक्षामधून सहा ते सात रुग्णालये फिरुन येथे आणतले गेले. मात्र कोठेही बेड उपलब्ध होऊ शकले नाही. नाशिकच्या बिटको रुग्णालयातसुध्दा बेड मिळाले नसल्याचे त्यांचे नातेवाईक सनी जाधव याने सांगितले. झाकीर हुसेन रुग्णालयातूनसुध्दा पदरी निराशा घेऊन सनी याने बाबाला अत्यवस्थ अवस्थेत रिक्षातून मीनाताई ठाकरे कोविड केअर सेंटरच्या दिशेने हलविले; मात्र तेथेही बेड मिळाले असेल का? याची शाश्वती देता येत नाही. (फोटो-२५पीएचएपी६९)