कांदा रोपे देता का कोणी कांदा रोपे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:17 AM2020-09-12T01:17:08+5:302020-09-12T01:18:05+5:30
कांदाची रोपे देता का कोणी कांदा रोपे, असे म्हणत गावोगाव भटकंती करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. सतत पडणाºया पावसामुळे शेतकºयांनी लावलेली रोपे खराब झाली आहेत.
एरंडगाव : कांदाची रोपे देता का कोणी कांदा रोपे, असे म्हणत गावोगाव भटकंती करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. सतत पडणाºया पावसामुळे शेतकºयांनी लावलेली रोपे खराब झाली आहेत. पायलीभर (सात किलो) टाकलेल्या कांदा बियाणात गुंठाभर रानाचीदेखील लागवड होत नाही. शेतकºयांनी घरी पिकवलेले कांदा बियाणे पहिल्या फेरीतच संपले आहे. आता शेतकरी बाजारातून कांदा बियाणे खरेदी करीत आहे.
या बियाणाचे भावही शिगेला पोहोचले आहेत. एक किलो बियाणाचा दर तीन हजारांच्या आसपास आहे. एवढे महागाचे बियाणे घेऊनही निसर्ग साथ देत नाही.
टाकलेले बियाणे कसेबसे येते आणि काही दिवसातच खराब होते. किमती औषधांची फवारणी करूनही रोपाची पोत सुधारत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.
उन्हाळ कांद्याचे बाजारभाव समाधानकारक असल्यामुळे कांदा लागवडीसाठी शेतकरी आतूर झाले आहे. रोप नसल्यामुळे रोपाच्या शोधासाठी भटकंती सुरू आहे.
घट होण्याची शक्यता
मागेल त्या भावात शेतकरी रोप खरेदी करण्यास इच्छुक असूनही रोप मिळत नाही. कांदा हे परिसरातील हुकमी पीक आहे. परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाल, रांगडा व उन्हाळ कांद्याची लागवड केली जाते. दरवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारात भाव आहे तर कांदे नाही म्हणजे नाक आहे तर नथ नाही आणि नथ आहे तर नाक नाही, अशा अवस्थेने शेतकºयांचा मोठा कोंडमारा झाला आहे.