कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच प्रवास करतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:12+5:302021-07-20T04:12:12+5:30

नाशिक रोड : देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना ...

Does the Corona only travel by passenger train? | कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच प्रवास करतो का?

कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच प्रवास करतो का?

googlenewsNext

नाशिक रोड : देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दीड वर्ष होऊनही अद्यापपर्यंत पॅसेंजर रेल्वे व सर्वसाधारण टिकीट सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय न घेतल्याने पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या गोरगरीब व सर्वसामान्य प्रवासी, मजूर, शेतकरी, छोटे-मोठे व्यापारी आदी सर्वांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वे प्रशासन एकीकडे हळूहळू जवळपास सर्वच प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस व मेल एक्स्प्रेस सुरू करीत आहे. मग, फक्त पॅसेंजर गाडीबाबत रेल्वे प्रशासन निर्णय घेत नसल्याने रेल्वे प्रशासनाला सर्वसाधारण तिकीट तर कायमस्वरूपी रद्द करायचे नाही ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पसरू लागल्याने पहिले चार महिने रेल्वे सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर प्रारंभी मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. आपापल्या राज्यात गावी परतणाऱ्या मजुरांसाठी रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडून दुसऱ्या राज्यात अडकलेल्या मजूर, कामगार व प्रवाशांना सोडण्यासाठी विशेष रेल्वे चालविण्यात आल्या. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोविड स्पेशल, फेस्टिवल स्पेशल रेल्वे सुरू केल्या.

--इन्फो--

नाशिक रोडमार्गे तीन पॅसेंजर

नाशिक रोड रेल्वे स्थानक मार्गे मनमाड - इगतपुरी शटल, मुंबई - भुसावळ पॅसेंजर, देवळाली - भुसावळ पॅसेंजर या तीन पॅसेंजर धावतात. मुंबई - भुसावळ पॅसेंजर तसेच देवळाली - भुसावळ पॅसेंजर हीदेखील या भागातील प्रवाशांसाठी खूप महत्त्वाची ठरते. नाशिक शहर जिल्ह्यातील खानदेश भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी या दोन्ही पॅसेंजर येण्याजाण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.

--इन्फो--

पॅसेंजर बंद का?

पॅसेंजर रेल्वेला प्रवाशांची खूप गर्दी होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे रेल्वेचे अधिकारी खाजगीत सांगतात. मात्र ज्या मेल व सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू केल्या आहेत त्यामध्येदेखील सामाजिक अंतर, मास्क वापरणे आदी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून प्रवासी प्रवास करतात. रेल्वे प्रशासनदेखील त्याकडे कानाडोळा करते. रेल्वे प्रशासन मेल एक्स्प्रेस, सुपरफास्ट एक्स्प्रेस, पॅसेंजर यांचे दर इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ठरवतात. यांच्या मार्फतच ऑनलाइन तिकीट काढले जाते. कोरोनामुळे आरक्षण तिकिटाला वेगवेगळे नियम केल्याने प्रत्येक रेल्वेचे तिकीट दर वेगळे आहेत. पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांची रेल्वे प्रशासन सरळ-सरळ आर्थिक लूट करीत आहे. फक्त पॅसेंजरबाबत रेल्वे प्रशासनाने आडमुठे धोरण स्वीकारले आहे.

--इन्फो--

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

गीतांजली एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, मुंबई - नागपूर विदर्भ एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कामयानी एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, पंजाब मेल, पंचवटी, राज्यराणी, तपोवन.

--इन्फो--

जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी किंवा शेजारच्या जिल्ह्यामध्ये कमी खर्चात जाण्यासाठी पॅसेंजर एक्स्प्रेस सर्वच प्रवाशांच्या दृष्टीने गरजेच्या आहेत. पॅसेंजरचे तिकीट दरदेखील कमी असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचे होते. परंतु पॅसेंजर रेल्वे बंद केल्याने रस्तामार्गे वाहतूक वाढली आहे.

त्यामुळे अपघाताच्या भीतीसोबत वेळेचा व पैशांचा अपव्यय होतो.

कैलास गायकवाड, प्रवासी

पॅसेंजर रेल्वे ही प्रवासादरम्यान सर्वच रेल्वे स्थानकांवर थांबत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी सोय होते. पॅसेंजरमुळे शेतीमाल, भाजीपाला एका गावातून दुसऱ्या गावात किंवा शहरात शेतकऱ्याला आणणे सोपे होते. त्यामुळे शहरातील नागरिकांना ताजा शेतीमाल कमी भावात मिळतो व शेतकऱ्यालादेखील रोख रक्कम तत्काळ मिळते. पॅसेंजर ही कामगार, नोकर, शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांच्या प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

सीमा हाळदे, प्रवासी

Web Title: Does the Corona only travel by passenger train?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.