न्यायालयांना राजकारण्यांविषयी आकस आहे का, रामराजे निंबाळकर यांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 04:25 PM2018-10-31T16:25:07+5:302018-10-31T16:46:00+5:30

सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे काही निकाल बघितले तर असेच वाटते अशी पुष्टीही त्यांनी जोडली. कोणत्याही कामासंदर्भात शासनाने किंवा संबंधित खात्याने केलेल्या आर्थिक तरतुदीशी निगडित कामे असतात, न्यायालयाच्या एका इमारत बांधकामापेक्षा मतदारांना केटीवेअर बांधून देणे हे आमदार आणि शासनाच्या दृष्टीने अधिक प्राधान्यक्रमाचे असते, असेही ते म्हणाले.

 Does the courts have a problem with politics, Ramaraje Nimbalkar's question | न्यायालयांना राजकारण्यांविषयी आकस आहे का, रामराजे निंबाळकर यांचा प्रश्न

न्यायालयांना राजकारण्यांविषयी आकस आहे का, रामराजे निंबाळकर यांचा प्रश्न

googlenewsNext
ठळक मुद्दे नाशिकमध्ये मान्यवरांशी साधला संवादमराठवाड्याला पिण्यापुरतेच पाणी देण्याची गरज

नाशिक : कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि विधि मंडळ आपापल्या स्तरावर सक्षम असले तरी न्यायालयाची सक्रियता वाढत आहे, जलस्रोताच्या विषयावर न्यायालय निर्णय घेते याबाबत काहीसे आश्चर्य विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे. न्यायालयची सक्रीयता वाढत आहेच, मात्र त्याच बरोबर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयांचे काही निकाल बघता न्यायव्यवस्थेला राजकारण्यांविषयी आकस आहे काय असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मराठवाड्याविषयी बोलताना त्यांनी केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच नाशिकमधून विसर्ग करावा, असे मतही व्यक्त केले.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या सभापती रामराजे निंबाळकर यांच्याशी गप्पाटप्पांचा कार्यक्रम बुधवारी (दि. ३१) कुसुमाग्रज स्मारकात झाला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे आमदार हेमंत टकले, माजी आमदार विलास लोणारी आणि मकरंद हिंगणे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायव्यवस्थेच्या चाकोरीतील सजगतेविषयी बोलताना निंबाळकर यांनी सध्या न्यायालये खूपच सक्रिय झाली असल्याचे मत नोंदविले. विशेषत: अलीकडील काळात पाण्यासारख्या विषयावर जलस्रोतांबद्दल न्यायालयच निर्णय देते असे सांगताना पर्यावरण आणि वनखात्याविषयीचे निर्णय तर न्यायालय परस्पर समित्या घोषित करून निर्णय घेत असल्याचे सांगून मंत्र्यांनादेखील त्याबाबत अधिकार नसल्याचे ते म्हणाले. मराठवाड्याला पाणी सोडावे किंवा नाही याबाबतदेखील कायदे असताना न्यायालय निर्णय देते असे सांगताना रामराजे यांनी चिंता व्यक्त केली. मराठवाड्याला पाणी द्यायला हवे; परंतु नाशिक जिल्ह्यातील पाण्याची स्थिती बघता ते केवळ पिण्यासाठीच द्यायला हवे उसाच्या शेतीसाठी नको असेही निंबाळकर यांनी मत व्यक्त केले.

न्यायालयासंदर्भातच आणखी एका प्रश्नावर बोलताना निंबाळकर यांनी न्यायालयाला राजकारणी आणि राज्यकर्त्यांविषयी आकस आहे काय असा प्रतिप्रश्न केला. अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी राजकारणी लोक किंवा सत्ताधारी न्यायालयासाठी इमारती बांधणे किंवा जागा देणे यासारखे कोणतेही विषय असले की ते बाजूला ठेवतात, त्यामुळे राजकारण्यांना न्यायालयाविषयी आकस आहे का? असा प्रश्न केला होता. त्यावर निंबाळकर यांनी टिप्पणी करतानाच हा प्रतिप्रश्न केला. सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे काही निकाल बघितले तर असेच वाटते अशी पुष्टीही त्यांनी जोडली. कोणत्याही कामासंदर्भात शासनाने किंवा संबंधित खात्याने केलेल्या आर्थिक तरतुदीशी निगडित कामे असतात, न्यायालयाच्या एका इमारत बांधकामापेक्षा मतदारांना केटीवेअर बांधून देणे हे आमदार आणि शासनाच्या दृष्टीने अधिक प्राधान्यक्रमाचे असते, असेही ते म्हणाले.

लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार
साता-यात उदयन राजे भोसले यांच्या विरोधात सर्व पक्षीयांनी रामराजे निंबाळकर हे पर्यायी उमेदवार सुचवले आहेत. त्यावर बोलताना उदयनराजे आणि माझे नऊ ठिकाणहून नातेसंबंध आहे. त्यामूळे यातच निवडणूकीचे उत्तर सामाविले आहे असे मिश्कीलपणे त्यांनी उत्तर दिले. अर्थात, वरच्या राजकारणात न्या असे मी १९९९ पासून शरद पवार यांना सांगत आहे. यंदाची लोकसभा निवडणूक ही तर देशाच्या पुढिल वाटचालीची दिशा ठरवणार असल्याने लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title:  Does the courts have a problem with politics, Ramaraje Nimbalkar's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.