बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात अडकले ‘श्वान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:24 AM2021-02-18T04:24:14+5:302021-02-18T04:24:14+5:30
मंगळवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मंगेश आव्हाड (२२) यांच्यावर आता नाशिक येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. ...
मंगळवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मंगेश आव्हाड (२२) यांच्यावर आता नाशिक येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. बेलगया मळा परिसरात सुधाकर आव्हाड यांची शेतजमीन असून तेथे त्यांनी मक्याचे पीक घेतलेले आहे. पाच ते सहा फूट मका असल्याने या भागात बिबट्या मादी व दोन बछडे असल्याचा संशय आहे. बिबट्या मादीला जेरबंद करण्यासाठी आव्हाड यांच्या गट नंबर १३४५ मध्ये सांयकाळी पाचच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने पिंजरा लावला. त्यात बिबट्याऐवजी श्वान जेरबंद झाले होते.
वनविभागाचे वनपाल डी. व्ही. तुपलोंढे व कर्मचारी मोबाईल व्हॅनद्वारे परिसरात रात्रभर थांबून होते. मंगळवारी मध्यरात्री कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावलेल्या जागेची पाहणी केली होती. पंरतु दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी (दि.१७) सकाळी कर्मचारी पिंजऱ्यात बिबट्या अडकला की नाही हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना पिंजऱ्यातत ‘श्वान’ आढळून आले. कर्मचाऱ्यांनी सकाळी पिंजरा उघडून श्वानाला हुसकावले.
इन्फो
पुन्हा मादी बिबट्याचे दर्शन
युवकाला जखमी केल्यानंतर या परिसरात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास मक्याच्या शेताजवळ काही शेतकऱ्यांना पुन्हा मादी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे. शेतजमिनीवर बिबट्याचे ठसेही दिसून आले आहेत. दरम्यान, नाशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी पी. बी. सोनवणे यांनी जखमी मंगेश आव्हाड यांची दवाखान्यात भेट घेऊन विचारपूस केली.