मातोरी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:03 AM2019-09-19T00:03:29+5:302019-09-19T00:03:54+5:30
मातोरी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, गावातील आळंदी कॅनललगत असलेल्या प्रवीण धोंडगे यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यातून वासराला भक्ष्य केले. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.
मातोरी : मातोरी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, गावातील आळंदी कॅनललगत असलेल्या प्रवीण धोंडगे यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यातून वासराला भक्ष्य केले. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.
मातोरी गावातील आळंदी डावा कालव्याला लागून असलेल्या प्रवीण कैलास धोंडगे या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या गायींवर मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून जखमी केले. तसेच एका वासराला शेजारील मोकळ्या जागेत ओढत नेत फडशा पाडला. रात्री जनावरे हंबरण्याचा आवाज येऊ लागल्याने धोंडगे यांनी गोठ्याकडे धाव घेतली असता गायी जखमी अवस्थेत आढळून आल्या तर वासराला ओढून नेल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी वासराचा शोध घेतला असता पाटाच्या कडेला मृतावस्थेत वासरू आढळून आले. बिबट्याच्या वास्तव्याने परिसरात भीती निर्माण झाली असून याबाबत वन विभागाने बिबट्याच्या पायांच्या ठशांवरून माग घेतला असता गेल्या काही दिवसांपासूनच वास्तव्य असल्याचे सांगितले. सदरील मृत जनावराचा वन विभागाने पंचनामा करत पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले आहे.