नगरसेवकांकडून घंटागाड्यांची पळवापळवी
By admin | Published: December 28, 2016 01:18 AM2016-12-28T01:18:24+5:302016-12-28T01:18:35+5:30
भुर्दंड मात्र ठेकेदारांना : खुलासा पत्रात गौप्यस्फोट
नाशिक : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने नगरसेवकांकडून लोकार्पण आणि उद््घाटन सोहळ्यासाठी नव्या घंटागाड्यांची पळवापळवी सुरू असून, त्याचा भुर्दंड मात्र ठेकेदारांना बसत आहे. वेळेत घंटागाड्या रस्त्यावर न आणल्याने या ठेकेदारांना साठ लाखांचा दंड वसुलीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दुसरीकडे नगरसेवक मात्र घंटागाड्या पळवत असल्याने वेळेत रस्त्यावर आणणार कशा? असा प्रश्नच ठेकेदाराने आरोग्य विभागाला दिलेल्या खुलासा पत्रात केला आहे.
महापालिकेच्या मालकीच्या घंटागाड्या पूर्वी ठेकेदारांना भाड्याने देण्यात आल्या होत्या, मात्र आता महापालिकेने नवा ठेका देताना अद्ययावत घंटागाड्या खरेदीची अट घातली होती.
त्यानुसार मनपाच्या ६१ प्रभागांसाठी २०६ घंटागाड्या ठेकेदारांनी रस्त्यावर आणणे आवश्यक आहे. मात्र, सध्या केवळ १३१ घंटागाड्या रस्त्यावर आहेत. जीपीआरएस बसविलेल्या या घंटागाड्या रस्त्यावर दिसत नसल्याने तांत्रिक तपासणीच्या माध्यमातून न दिसलेल्या घंटागाड्यांपोटी ठेकेदारांना दंड बजावला जात आहे. आजमितीला साठ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच संबंधित दोन ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी सातपूर आणि पूर्व नाशिकचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराने आरोग्य विभागाला खुलासा केला असून, त्यात नगरसेवकांकडून नव्या घंटागाड्या परस्पर नेल्या जात असल्याने त्या मुख्य कामासाठी रस्त्यावर आणता येत नसल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)