मुसळगावी प्रगती पॅनलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 08:40 PM2021-01-19T20:40:40+5:302021-01-20T01:23:55+5:30
मुसळगाव : अत्यंत चुरशीच्या झालेल्या मुसळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी मुसळेश्वर प्रगती पॅनलने आठ जागांवर विजय मिळविला तर दोन जागा अवघ्या दोन-दोन मतांनी गमावल्याने पॅनलला जबरदस्त धक्का बसला. मुसळेश्वर परिवर्तन पॅनलला पॅनलचे नेते गोविंद माळी यांचा पराभव झाला असला, तरी त्यांच्या पॅनलने सहा जागांवर विजय मिळविला आहे. कमकुवत समजलेल्या तिसऱ्या आघाडीने ठरवून तीनच जागांवर उमेदवार उभे केले व त्या तीनही जागांवर यश मिळवले.

सिन्नर तालुक्यात आर्थिकदृष्ट्या सर्वात सशक्त समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी मुसळगाव ग्रामपंचायत आहे.औद्योगिक सहकारी वसाहतीचा कर ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याने अनेक विकासकामे मार्गी लावता येतात, तसेच तरुणांनी निवडणुकीत घेतलेल्या सहभागामुळेही निवडणूक अत्यंत अटीतटीची पार पडली. सतरा जागांवर झालेल्या निवडणुकीत प्रभाग एकमध्ये रूपाली पिंपळे या विजयी झाल्या. तर मीरा काकड यांनी भारती गुरव यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. प्रभाग दोनमध्ये तुल्यबळ लढतीत दत्तु ठोक, तसेच सचिन सिरसाट, योगिता सिरसाट विजयी झाले.
प्रभाग तीनमध्ये सुनीता मोरे, एकनाथ सिरसाट व संध्या राजगुरु विजयी झाले. प्रभाग चारमध्ये शुभम माळी या नवोदिताने परिवर्तन पॅनलचे नेते गोविंद माळी यांचा पराभव केला. चंचल सांगळे व शुभांगी घोलप विजयी झाल्या. प्रभाग पाचमध्ये मुसळेश्वर प्रगती पॅनलचे राजू जाधव बिनविरोध निवडून आले. तर रवींद्र शिंदे व माया जाधव विजयी झाले. प्रभाग सहामध्ये तिसऱ्या आघाडीने तीनही जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. यात अनिल सिरसाट ,सुवर्णा सिरसाट व हिराबाई माळी यांचा समावेश आहे.
सरपंचपदासाठी चुरस
सरपंच आरक्षण सर्वसाधारण गटाचे निघाले तर मुसळगावला ऐनवेळी सत्ता मिळवण्यासाठी तिसऱ्या आघाडीला महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे आरक्षणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यावेळी विजयी उमेदवारांनी गावात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.