नको दुखवट्याची टॉवेल टोपी द्या नोट बुकची कॉपी; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

By संजय दुनबळे | Published: July 13, 2023 06:50 PM2023-07-13T18:50:21+5:302023-07-13T18:50:40+5:30

या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

donate books initiative is widely appreciated | नको दुखवट्याची टॉवेल टोपी द्या नोट बुकची कॉपी; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

नको दुखवट्याची टॉवेल टोपी द्या नोट बुकची कॉपी; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

googlenewsNext

संजय दुनबळे, नाशिक : दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात दुखवटा म्हणून टॉवेल, टोपी, कपडे, साडी आदी देण्याची प्रथा पारंपरिक पद्धतीने चालत आली आहे, पण या कार्यक्रमात मिळालेल्या वस्तू पुढे किती लोक वापरतात, हा स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरावा. अनेक वेळा टॉवेल, टोपी, शाल यांचा खर्च तर वायाच जातो. हीच बाब ओळखून निफाडसारख्या ग्रामीण भागातील साळुंखे कुटुंबीयांनी दुखवट्याला फाटा देत, वही आणि पेन देण्याचे आवाहन केले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. जमा झालेल्या वह्या आणि शैक्षणिक साहित्य एका आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वाटण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रतापराव साळुंके यांचे नुकतेच निधन झाले आहे. प्रतापराव साळुंके यांचे वडील कॅप्टन भीमराव साळुंके हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक होते. यामुळे बालपणापासूनच प्रतापराव यांना आंबेडकरी चळवळीचे बाळकडू मिळाले होते. वयाच्या ८२व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. हयातभर आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वडिलांच्या जीवनावर त्यांनी पुस्तकही प्रकाशित केले आहे. कुटुंबातील मुलांनाही त्यांनी चांगले शिक्षण दिले. त्यांचा जलदान विधीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा दुखवटा न स्वीकारता, वही आणि पेन किंवा शैक्षणिक साहित्य आणावे, अशा सूचनाच त्यांच्या कुटुंबीयांनी दिल्या. याला त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक नागरिकांनी किमान डझन, अर्धा डझन वह्या काहींनी आंबेडकरांचे ग्रंथ, जीवनचरित्र, तर काहींनी कंपास, पेन, पेन्सिल यांची भरभरून मदत दिली. या एका कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात वह्या आणि शैक्षणिक साहित्य जमा झाले. हे साहित्य निफाडमधीलच एका आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

शाळा सुरू होत असतानाच, विद्यार्थ्यांना नवीन वह्यांसह शैक्षणिक साहित्यही मिळाल्याने, त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान पाहायला मिळाले. दुखवटा म्हणून देण्यात येणाऱ्या टोपी, टॉवेल इतकाच खर्च जर वही-पेनसाठी केला, तर किती मोठे कार्य होऊ शकते, याची प्रचिती या उपक्रमातून अनेकांनी आली. साळुंके कुटुंबीयांनी राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, समाजबांधवांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवून होणाऱ्या वायफळ खर्चाला फाटा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: donate books initiative is widely appreciated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक