दानशूर संस्थांच्या माध्यमातून तीन लाख व्यक्तींना अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 09:51 PM2020-04-23T21:51:53+5:302020-04-24T00:17:33+5:30
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे अनेक कुटुंबांवर हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली येत असल्याचे समजताच अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या व त्यांनी पुढाकार घेऊन आतापर्यंत तीन लाख लोकांना अन्नदान केले आहे.
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे अनेक कुटुंबांवर हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली येत असल्याचे समजताच अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या व त्यांनी पुढाकार घेऊन आतापर्यंत तीन लाख लोकांना अन्नदान केले आहे. अशा दानशूर स्वयंसेवी संस्थांचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळासाठी इतरही संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
इमर्जंसी अॅक्शन सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यात जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांचे संनियंत्रण केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून आज बेघर व स्थलांतरित नागरिकांसाठी रिलीफ कॅम्प, भारतीय अन्न महामंडळाकडून धान्य पुरवठा तसेच अनेक स्वयंसेवी संस्थामार्फत अन्नदान केले जात असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. आजपर्यंत ३६ स्वयंसेवी संस्था व व्यक्तींमार्फत नाशिक शहरातील विविध ठिकाणी एकूण तीन लाख लोकांना अन्नदान करण्यात आले आहे. सकल जैन संघटना यांच्यामार्फत म्हसरूळ, जुने नाशिक, सिडको, सातपूर, अंबड व पाथर्डी, द्वारका ते नाशिकरोड, आग्रा हायवे, विल्होळी मंदिर येथील लोकांना अन्नदान केले आहे. सकल जैन संघटना व वेलकम सहकार्य मित्रमंडळ यांच्यामार्फत जुने नाशिक, भद्रकाली, गंगाघाट येथे अन्नदान केले आहे. श्री गुरु व्दारा गुरु नानक दरबार शिंगाडा तलाव, श्री गुरुव्दारा देवळाली व रॉबीन हुड आर्मी यांच्यामार्फत, अमिगो लॉजेस्टीकस इंडिया व दिनीयत संस्था यांच्यामार्फत बेलतगाव, व्हिलरेज, स्टेशनवाडी, जयभवानीरोड, बिटको, उपनगर कॅनॉलरोड, गोरेवाडी, जेलरोड, बागुलनगर झोपडपट्टी येथील लोकांना, वुई फाउंडेशन यांच्यामार्फत सिव्हील हॉस्पिटल नाशिक येथील लोकांना अनिकेत उपासनी यांच्यामार्फत रंगरेज कॉलनी, वडाळा येथे अन्नदान करण्यात आले आहे. श्रीजी प्रसाद व झेप व नयनतारा ग्रुप, गुरमित बग्गा यांच्यामार्फत गाडगेबाबा निवारा, इंद्रकुंड निवारा, मखमलाबाद नाका शाळा, म्हाडा कॉलनी, पाथर्डी फाटा, पंचवटी परिसर येथे अन्नदान करण्यात येत आहे.