दोन लाख ४० हजार मूर्तींचे दान

By Admin | Published: September 17, 2016 12:27 AM2016-09-17T00:27:30+5:302016-09-17T00:27:42+5:30

नाशिककरांचा प्रतिसाद : महापालिकेने उचलले १६९ टन निर्माल्य

Donation of two lakh 40 thousand idols | दोन लाख ४० हजार मूर्तींचे दान

दोन लाख ४० हजार मूर्तींचे दान

googlenewsNext

नाशिक : जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेसह विविध स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या आवाहनाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत अनंत चतुर्दशीला दोन लाख ३९ हजार २२८ गणेशमूर्तींचे दान केले. याशिवाय, महापालिकेने ठिकठिकाणी उभारलेल्या केंद्रांवर दिवसभरात १६९ टन निर्माल्य उचलले. पुणे महापालिकेच्या धर्तीवर महापालिकेसह स्वयंसेवी संस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या अमोनियम बायकार्बोनेट पावडरलाही नागरिकांनी प्रतिसाद देत इको फ्रेंडली गणेश विसर्जनाचा प्रयोगही करून पाहिला.
गुरुवारी गणेश विसर्जनासाठी महापालिकेने ५९ ठिकाणे निश्चित केली होती. त्यात २९ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली होती, तर प्रत्येक ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी गणेशमूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता ती दान करावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून महापालिकेसह स्वयंसेवी संस्थांकडून प्रबोधन केले जात आहे. यंदाही महापालिकेने विविध संस्थांच्या मदतीने मूर्ती संकलनासाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार, दोन लाख ३९ हजार २२८ गणेशमूर्ती दान स्वरूपात संकलित झाल्या. सर्वाधिक गणेशमूर्तींचे दान पंचवटी विभागात झाले. पंचवटी परिसरात ८६ हजार ३८४ मूर्ती संकलित करण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. मूर्ती संकलनासाठी काही केंद्रांवर स्वत: महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख आणि आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी उपस्थित राहून नागरिकांकडून गणेशमूर्ती दान स्वरूपात स्वीकारल्या. बांधकाम विभागाकडून सदर मूर्ती संकलनाची माहिती दर दोन तासांनी घेतली जात होती. अनेक नागरिकांनी गोदावरीच्या पाण्यात मूर्ती बुडवून नंतर ती दान केली. काही केंद्रांवर मूर्ती दान करण्यासाठी नागरिकांच्या रांगाही लागल्या होत्या. याचबरोबर महापालिकेकडून प्रत्येक केंद्रावर निर्माल्य संकलनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार दिवसभरात १६९ टन निर्माल्य जमा झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Donation of two lakh 40 thousand idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.