अनोळखी माणसाला मोबाइल देऊ नका; क्षणात बँक खाते होऊ शकते साफ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:17 AM2021-08-22T04:17:59+5:302021-08-22T04:17:59+5:30
सायबर गुन्हेगारांना बँकेच्या खात्यातून रक्कम लंपास करण्यासाठी खूप काही परिश्रम घ्यावे लागतात, असे नाही, तर ओटीपी क्रमांक एखाद्या पैसे ...
सायबर गुन्हेगारांना बँकेच्या खात्यातून रक्कम लंपास करण्यासाठी खूप काही परिश्रम घ्यावे लागतात, असे नाही, तर ओटीपी क्रमांक एखाद्या पैसे रिसिव्ह करण्याच्या लिंक पाठवून सायबर गुन्हेगार रक्कम गायब करतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तीने मोबाइलची मागणी केल्यास ते त्याच्या हातात सोपविणे धोक्याचे ठरू शकते. एखादी व्यक्ती जर स्वत:ला अडीअडचणीत असल्याचे भासवून मोबाइलद्वारे संपर्क करण्यासाठी मोबाइलची मागणी करत असेल, तर त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवण्यापूर्वी खात्री करणे आर्थिक फसवणूक टाळू शकतो, असे पोलिसांनी सांगितले.
---इन्फो---
ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक
कॉल करण्यासाठी मोबाइल घेऊन
‘मला अडचण आहे, मोबाइलचा रिचार्ज संपला, असे सांगून कॉल करण्याकरिता मोबाइल मागितला जाऊ शकते.’
--
वेगळी लिंक पाठवून
एखादी स्कीम किंवा ऑफर असल्याचे सांगून त्याद्वारे माहिती देत असल्याचे भासवून लिंक पाठविली जाऊ शकते, ही लिंक मुळातच पेमेंट रीसिव्हची असते, हे लक्षात घ्यावे.
---
लॉटरी लागली आहे सांगून
एखादी व्यक्ती आपल्याशी संपर्क साधत लॉटरी लागली आहे, असे सांगून रक्कम मिळणार असल्याचे आमिष दाखवूनही ओटीपी प्राप्त करून घेत फसवणूक करू शकतो.
---
केवायसीसाठी आवश्यक असे सांगून
केवायसीकरिता आधार कार्ड, पॅन कार्ड आदींची माहिती जाणून घेऊनही फसवणूक होऊ शकते. त्यामुळे केवायसीकरिता आलेल्या कॉलवर विश्वास दाखविणे आर्थिक भुर्दंडाला निमंत्रण देण्यासारखे आहे.
---इन्फो--
...ही घ्या काळजी
१) ऑनलाइन पेमेंट करतानाही काळजी घेणे आवश्यक आहे. क्युआर कोडची खात्री पटवून पेमेंट करावे, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता असते.
२) अनोळखी ई-मेल किंवा मेसेजेसद्वारे करण्यात आलेल्या केवायसीची मागणी ही खोटी असते, हे पूर्णत: लक्षात घ्यावे. कुठलीही बँक ऑनलाइन केवायसीकरिता ग्राहकांशी संपर्क साधत नाही.
३) वैयक्तिक कर्ज, विनव्याजी कर्ज, तत्काळ कर्ज, कमी कागदपत्रांमध्ये कर्ज देण्याचे आमिष दाखवूनही फसवणूक केली जाऊ शकते. यामुळे कर्ज घेताना अर्थसाहाय्य करणाऱ्या अधिकृत कंपनीच्या जवळच्या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधणे हिताचे ठरते.
४) अनेकदा तर सायबर गुन्हेगार ना कॉल करतात, ना ओटीपी मागतात, तरीही बँकेतून रक्कम गायब होते, कारण एखादे मोबाइल ॲप डाऊनलोड करताना सायबर गुन्हेगार बनावट ॲपमध्ये पेमेंटच्या बाबतीत लिंक देतात आणि त्याद्वारे आपोआपच ॲक्सेस त्यांच्याकडे जातो आणि मोबाइलमधून डेटा चोरी केला जातो. त्यामुळे ॲप डाऊनलाेड करताना सतर्कता बाळगणे गरजेचे ठरते.