लागी नाही छुटे रामा, चाहे जिया जाये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:02+5:302021-07-08T04:12:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : सिनेमाच्या आरंभापासूनचा पहिला महानायक अभिनेता दिलीपकुमार यांना अभिनयाप्रमाणेच गायनातही रस होता. १९५७ साली प्रदर्शित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सिनेमाच्या आरंभापासूनचा पहिला महानायक अभिनेता दिलीपकुमार यांना अभिनयाप्रमाणेच गायनातही रस होता. १९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मुसाफिर’ या चित्रपटासाठी दिलीपकुमार यांनी स्वत: एक युगलगीत स्वरसम्राझी लता मंगेशकर यांच्या समवेत गायले होते. त्यांच्या ‘लागी नाही छुटे रामा, चाहे जिया जाये’ या एकमेव गीताच्या स्मृतीदेखील दिलीपकुमारप्रेमींनी त्यांच्या या हृदयाच्या कुपीत जपून ठेवल्या आहेत.
मध्यरात्रीच्या निरव शांततेत व्याकूळ करणाऱ्या व्हायोलिनच्या सुरावटी... शेजारच्या खोलीत झोपलेली नायिका त्या सुरावटींनी घायाळ होऊन नायकाच्या खोलीचा पडदा बाजूला सारते... ती त्याला विचारते, ‘क्यूं बजा रहे थे ये धून’...तो म्हणतो, ‘अभी तक याद हैं तुम्हे...’ ती म्हणते, ‘जो धून बीच रास्ते में खो गयी, उसे याद करने से क्या फायदा..’ तो म्हणतो, ‘पर याद तो कभी कभी आ ही जाती हैं!’ अन् त्यानंतर तो म्हणजे अर्थात ट्रॅजिडी किंग दिलीपकुमार त्या गीताच्या आठवणी त्यांच्या सुरांतून व्यक्त करतात अन् नायिकाही साथ देते. अशा अफलातून जमून आलेल्या या गाण्याच्या सुरावटी दिलीपकुमार यांच्या आवाजासह मनात रुंजी घालत राहतात. कोणतेही काम करायचे, तर ते शंभर टक्के जीव ओतून या त्यांच्या स्वभावाची झलक या गीतातूनही अनुभवता येते. समवेत गाण्यासाठी स्वरसम्राझी लतादीदी असल्या तरी आपण तसूभरही कमी पडणार नाही, यासाठी त्यांनी त्यांच्या गायनाचे सर्व कौशल्य पणाला लावल्यानेच ते गाणे अत्यंत जमून आले आहे. शास्त्रीय सुरावटींवर आधारित रचनांसाठी प्रख्यात असलेले संगीतकार सलील चौधरी यांच्या या गीताला शैलेंद्र यांचे शब्द असून, नंतर जगद्विख्यात झालेले चित्रपट दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांचा हा पहिलाच चित्रपट होता. या गीतात पडद्यावर दिलीपकुमार यांच्यासमोर अभिनेत्री उषा किरण असून, विशेष म्हणजे त्यांचाही नाशिकशी ऋणानुबंध आहे.
इन्फो
दोनच चरणांचे गाणे
दिलीपकुमार यांनी गायलेले हे गाणे म्हणजे पूर्वायुष्यातील आठवणींची झलक असल्याने प्रत्यक्षात ते गाणे केवळ दोनच चरणांचे आहे. मात्र, तरीदेखील त्या गीतासाठी दिलीपकुमार यांनी खास त्यांच्या शैलीत प्रदीर्घ काळ रियाझ करूनच फायनल टेक दिले होते.
फोटो (०७्ंदिलीपकुमार गाणे)
‘मुसाफिर’ चित्रपटाच्या गाण्यासाठी रेकॉर्डिंग करताना अभिनयसम्राट दिलीपकुमार आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर.