कुणावरही नाही तुमच्या अनुभवावर विश्वास ठेवा : जगन्नाथ दीक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 01:33 AM2022-05-30T01:33:55+5:302022-05-30T01:34:28+5:30
मधुमेह रुग्णांना ज्यावेळी मधुमेह असल्याचे कळते तेव्हा त्यांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील, असे सांगितले जाते. यामुळे ते निराश झालेले असतात. यासाठी ते काहीही करायला तयार असतात, पण कोणतीही गोष्ट मनाने करू नका. त्यासाठी सल्ला घ्या. कुणावरही विश्वास ठेवू नका तुमच्या अनुभवावरच विश्वास ठेवा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.
नाशिक : मधुमेह रुग्णांना ज्यावेळी मधुमेह असल्याचे कळते तेव्हा त्यांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील, असे सांगितले जाते. यामुळे ते निराश झालेले असतात. यासाठी ते काहीही करायला तयार असतात, पण कोणतीही गोष्ट मनाने करू नका. त्यासाठी सल्ला घ्या. कुणावरही विश्वास ठेवू नका तुमच्या अनुभवावरच विश्वास ठेवा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले. येथील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि.२९) आयोजित ‘जीवनशैली बदलातून स्थूलत्व व मधुमेहमुक्ती’ या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. दीक्षित म्हणाले, माणूस सर्वाधिक वर्ष जंगलात राहिलेला आहे. यामुळे तसे पाहिले तर त्याला उपाशी राहण्याची सवय आहे. माणसाच्या पेशी उपाशी राहण्यासाठी तयार झालेल्या आहेत. भरपेट खाण्यासाठी नाही. जो तीनदा खातो तो रोगी हे जेव्हा माणसाला कळू लागले तेव्हा तो वेगळ्या जीवनशैलीकडे वळाला. यावेळी त्यांनी जीवनशैली आणि डाएट प्लान यांमधील फरक समजावून सांगितला. डाएट प्लान यशस्वी होण्यासाठी पैसा लागतो, तर जीवनशैली फुकटात यशस्वी होते. यासाठी तुम्हाला जे खायचे ते खा, पण भुकेच्या वेळेला खा. हे जर केले तर तुमच्या ८० टक्के समस्या तेथेच कमी होतात. कोणतीही गोष्ट लगेचच होत नाही, तर त्याला काही कालावधी जाऊ द्यावा लागतो. यामुळे किमान तीन महिने प्रयाेग करावा, असेही ते म्हणाले. प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी काही लाभार्थ्यांनी डॉ. दीक्षित यांच्या पद्धतीचा अवलंब केल्यानंतर आलेल्या अनुभवांचे कथन केले. डाॅ. दीक्षित यांच्या संस्थेच्यावतीने आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण आणि संस्थेला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील नागरिक माठ्या संख्येने उपस्थित होते.